केएलएसला ज्ञान प्रबोधनने तर एमव्हीएमला मदनीने रोखले
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित बीडीएफए चषक 14 वर्षाखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून लव्हडेल संघाने केएलईचा 3-1 असा पराभव करून 3 गुण मिळविले. केएलएसला ज्ञान प्रबोधनने 1-1 तर एमव्हीएमला मदनीने गोलशून्य बरोबरीत रोखले.
लव्डडेल स्कूलच्या स्पोर्टींग प्लॅनेट ऍस्ट्रोटर्फ फुटबॉल मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात केएलएसला ज्ञान प्रबोधन संघाने 1-1 असे बरोबरीत रोखले. 19 व्या मिनिटाला श्रेयस पेडणेकरने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱया सत्रात 35 व्या मिनिटाला ज्ञान प्रबोधनला पंचांनी पेनल्टी बहाल केली. त्यावर अर्चित पाटीलने गोल करून 1-1 अशी बरोबरी करत सामन्यात रंगत निर्माण केली. त्यानंतर केएलएसने गोल करण्याच्या नामी संधी दवडल्याने सामना बरोबरीत राहिला.
दुसऱया सामन्यात लव्हडेल संघाने केएलई इंटरनॅशनल संघाचा 3-1 असा पराभव केला. या सामन्यात 8 व्या मिनिटाला केएलई इंटरनॅशनलच्या रिहान काटकरने गोल करून आघाडी मिळवून दिली. 14 व्या मिनिटाला लव्हडेलच्या सय्यद अब्दुलच्या पासवर ईशान किल्लेदारने पहिला गोल करून 1-1 अशी बरोबरी करीत सामन्यात रंगत निर्माण केली. 20 व्या मिनिटला ईशान किल्लेदारच्या पासवर नयन नंजण्णावरने दुसरा गोल करून लव्हडेलला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱया सत्रात 33 व्या मिनिटाला नयन नंजण्णावरच्या पासवर सय्यद अब्दुलने तिसरा गोल करून 3-1 अशी आघाडी मिळवून देत विजय साकार केला.
तिसऱया सामन्यात एमव्हीएम संघाला मदनी संघाने गोलशून्य बरोबरीत रोखले. या सामन्यात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने शेवटी हा सामना बरोबरीत राहिला.
मंगळवारचे सामने : 1) सेंट झेवियर्स वि. केएलएस दुपारी 1 वा. 2) सेंट मेरीज वि. केएलई 2 वा., 3) इस्लामिया वि. मदनी दु. 3 वा.
सेंट जोसेफ संघाची विजयी सलामी
बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित बीडीएफए चषक 17 वर्षाखालील मुलींच्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात सेंट जोसेफ संघाने सेंट मेरीज संघाचा 3-0 असा पराभव केला.
या मुलींच्या सामन्यात सातव्या मिनिटाला सेंट जोसेफच्या सिल्व्हीया गोम्सच्या पासवर शर्लीनी पडिवालने पहिला गोल केला. दुसऱया सत्रात 32 व 37 व्या मिनिटाला शर्लीनीच्या पासवर सिल्व्हीया गोम्सने सलग दोन गोल करून 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. सेंट मेरीजच्या खेळाडूंनी अनेकदा प्रयत्न केला. पण जोसेफच्या भक्कम बचावफळीपुढे त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले.
मंगळवारचा सामना : सेंट झेवियर्स वि. सेंट मेरीज, दुपारी 12 वा.