वृत्तसंस्था/ अहमदाबाद
क्रेकेटमधील सर्वांत भव्य स्पर्धांपैकी एक असलेली ‘इंडियन प्रीमियर लीग’ यंदा अनेक थरारक सामन्यांचा अनुभव घेऊन शेवटी सोमवारी संपुष्टात आली. 31 मार्च रोजी सुरू झालेली ही स्पर्धा जवळपास दोन महिने चालली आणि यावेळचा अंतिम सामना देखील पावसामुळे ठरलेल्या दिवशी न होता वेगळे वळण मिळून राखीव दिवशी खेळवावा लागला. सोमवारी अंतिम सामन्याच्या नाणेफेकीपूर्वी ‘आयपीएल 2023’चा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी संगीतकार न्युक्लिया आणि रॅपर ‘किंग’ यांनी आपल्या गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
वरील दोघांनीही अतिशय मनोरंजक गाणी सादर केली आणि अंतिम सामना सुरू होण्यापूर्वीच प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. न्युक्लियाने रविवारीही सादरीकरण केले होते. मात्र, त्यानंतर पावसाला सुऊवात झाली होती आणि चाहत्यांची मजा विरली होती. पण सोमवारी हवामान चांगले असल्याने प्रेक्षकांनी सामन्याचा पुरेपूर आनंद घेण्यापूर्वी झालेल्या या कार्यक्रमाचाही मनसोक्त आनंद घेतला.
गायक ‘किंग’ने प्रेक्षकांना त्याच्या गीतांवर ताल धरण्यास भाग पाडले. ‘चेन्नई सुपर किंग्स’चा कर्णधार महेंद्रसिंह धोनी मैदानात येताच त्याने ‘ओ मेरे सोना रे, सोना रे, सोना रे, दिल से जुदा मत होना रे’ हे गाणे सादर केले. धोनी मैदानात उतरताच चाहत्यांनी जल्लोष केला. यानंतर ‘किंग’ने त्याचे ‘तू मान मेरी जान, तुझे जाने ना दूंगा’ हे गाणे सादर केले. यादरम्यान कॅमेरा धोनीवरच होता आणि प्रेक्षकांकडूनही धोनीचा जयजयकार चालू होता.