स्कूल-कॉलेज विद्यार्थ्यांसह प्रवाशांना होणार लाभ
वार्ताहर /किणये
बेळवट्टी-किणये भागात नवीन बसफेरीला सुरुवात करण्यात आली आहे. या बसफेरीमुळे किणये येथील मराठा मंडळ हायस्कूल, इंग्रजी माध्यम व कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह प्रवाशांना लाभ होणार आहे. या बसफेरीचा शुभारंभ सोमवारी मराठा मंडळ कॉलेजजवळ करण्यात आला.
बेळगाव सीबीटी येथून ही बस बेळवट्टी गावात सकाळी 7.25 वाजता पोहोचणार आहे. त्यानंतर बिजगर्णी, कावळेवाडी, कर्लेमार्गे बहाद्दरवाडी क्रॉस येथून किणये मराठा मंडळ येथे थांबून बेळगावकडे जाणार आहे. त्यानंतर दुपारी पुन्हा 1.30 वाजता बेळगाव येथून बेळगाव-चोर्लामार्गे बस बहाद्दरवाडी क्रॉस येथे येणार आहे. त्यानंतर बहाद्दरवाडी, कर्ले, कावळेवाडी, बिजगर्णीमार्गे बेळवट्टीला जाणार व त्यानंतर बेळगाव-बेळगुंदीमार्गे ही बस बेळगावला जाणार आहे. दिवसातून दोन वेळा या बसची फेरी होणार आहे.
पश्चिम भागातील नागरिक व विद्यार्थ्यांसाठी ही बसफेरी फार महत्त्वाची ठरणार असल्याने विद्यार्थी व प्रवासीवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
किणये येथे मराठा मंडळ संचालित शंकरराव पाटील ज्युनियर कॉलेज आहे. या कॉलेजला पश्चिम भागातील विद्यार्थी येत असतात. या विद्यार्थ्यांना कॉलेजला येताना दुचाकीस्वार, टेम्पो व इतर वाहनधारकांचा आधार घ्यावा लागत होता. या बसफेरीमुळे विद्यार्थ्यांना कॉलेजला येणे व जाणे सोयीस्कर ठरणार आहे.
ही बस सुरू झाल्यामुळे किणये, बहाद्दरवाडी, कर्ले, जानेवाडी, कावळेवाडी, बिजगर्णी, बेळवट्टी, बेळगुंदी भागातील प्रवाशांनाही सोयीस्कर ठरणार आहे. ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून ही बससेवा सुरू करण्यात आली आहे.
सोमवारी सकाळी किणये येथील मराठा मंडळ कॉलेजसमोर बसचे पूजन करण्यात आले. कॉलेजचे प्राचार्य आर. पी. गोडसे यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. या बसफेरीच्या शुभारंभाबद्दल समाधान व्यक्त करत प्रवाशांसाठी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी ही बस उपयुक्त ठरणार आहे, असे सांगितले. बसफेरीच्या शुभारंभप्रसंगी कर्नाटक राज्य परिवहन मंडळाचे केमसिंग लमाणी, विजयकुमार होसमनी, किणये ग्रा. पं. सदस्य मारुती डुकरे, सातेरी कोकीतकर आदींसह पालकवर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होता.