अध्याय एकोणतिसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा सर्वसामान्य लोकांनी सहजपणे ब्रह्मप्राप्ती होण्यासाठी माझी भक्ती करावी. ज्याप्रमाणे नारद, प्रल्हाद, अंबरीष असे श्रेष्ठ भक्त रात्रंदिवस माझ्या भक्तीत रममाण होतात त्याप्रमाणे साधकानेही माझ्या भक्तीत तल्लीन व्हावे. माझी भक्ती करण्यासाठी भक्ताने काय काय करावे तेही सांगतो. भक्ताने वार्षिक यात्रा, पर्वपूजा, अधोक्षजाला अर्पण कराव्यात. छत्रचामरादि गोष्टी, गरुडध्वजांकित चिन्हे इत्यादि राजामहाराजांना शोभणाऱ्या गोष्टी श्रद्धेने देवाला अर्पण कराव्यात. अत्यंत उत्साहाने अहोरात्र माझे भजन करावे, हत्ती किंवा घोड्यावर माझी मूर्ती विराजमान करून मिरवणूक काढावी.
शेषशायी अथवा गरुडावर आरूढ झालेल्या माझ्या मूर्तीची महोत्सवात रथयात्रा काढावी. त्यात भक्तांनी अगदी रंगून जावे. ही सर्व धडपड करण्याचे कारण म्हणजे ह्या सर्व खटाटोपातून भक्तांना माझ्या भक्तीची चढतीवाढती गोडी लागावी. माझे महात्म्य मनात ठसावे. असे झाले की, सर्व कर्तृत्व आणि भोत्तृत्व मला अर्पण करून तो निश्चिंत होतो. मी त्याच्या भल्याच्या गोष्टी घडवून आणत आहे हे लक्षात आले की, त्याचे माझ्यावर प्रेम बसते. ते अखंड टिकून रहावे ह्यासाठी ह्या सर्व उत्सवाचे प्रयोजन आहे. त्यामुळे माझ्याबद्दलचे भक्ताचे प्रेम आणखीनच वाढते.
उत्सवकाळात उत्सव उत्तम झाला पाहिजे ह्या उद्देशाने तो केवळ माझाच विचार करत असतो. काय केले म्हणजे मला आवडेल हा दृष्टीकोन ठेऊन त्याची उत्सवाची आखणी सुरु असते. त्यामुळे मी आणि मीच त्याच्या मनात वास करून असतो. तेथे अन्य विचारांना थाराच नसतो. सदोदित माझाच विचार त्याच्या मनात डोकावत असतो.
ह्या सगळ्याचा परिणाम होऊन, हळूहळू त्याला माझ्याखेरीज अन्य काही आवडेनासे होते. तो माझ्याठायी अनन्य होतो. माझ्यावर आत्यंतिक प्रेम करू लागतो. अशी सप्रेम भक्ती करणाऱ्या मदभक्ताला मी माझी अंतरंग भक्ती देऊन संतुष्ट करतो. उद्धव भगवंतांचे सांगणे जीवाचे कान करून ऐकत होता. देवांनी अंतरंग भक्तीचे नाव काढल्यावर कधी एकदा त्याबद्दल त्यांच्या तोंडून अंतरंग भक्तीबद्दल ऐकतो असे त्याला होऊन गेले. भगवंतांनी त्यांची उत्सुकता जास्त ताणली नाही. उद्धवासारखा जीवाचे कान करून ऐकणारा श्रोता लाभणे हेही भाग्याचे लक्षण आहे हे ते जाणून असल्याने ते अंतरंग भक्तीबद्दल समरसून सांगू लागले.
ते म्हणाले, उद्धवा नीट लक्ष देऊन ऐक, जे माझी भक्ती अत्यंत भक्तीभावाने करतात त्यांची चित्तशुद्धी होत जाते. त्यांच्यातील विकार मावळत जातात आणि ते राग, लोभ इत्यादि भावनांच्या पलीकडे जातात. साहजिकच प्रत्येक प्राणिमात्रातील ईश्वराचे त्यांना दर्शन होऊ लागते. त्यालाच आत्मदृष्टी असे म्हणतात आणि चीत्तशुद्धीच्या प्रमाणात त्यांच्यावर गुरुकृपा होत राहते. निजात्मदृष्टीमुळे सर्व भुतांच्या अंतरी त्यांना माझे दर्शन तर होतेच परंतु भुतांच्याबाहेरील सर्व सृष्टीत त्यांना मीच दिसू लागतो.
साहजिकच त्यांना त्यांच्यामध्ये असलेली माझी उपस्थिती प्रकर्षाने जाणवू लागते. मातीच्या माठात पोकळी असते त्याला आकाश म्हणतात आणि माठाच्या बाहेर जी पोकळी असते त्याला महदाकाश असे म्हणतात. त्याप्रमाणे भूतात तर मी असतोच आणि भुतांच्या बाहेरील सर्व सृष्टीही मीच व्यापून राहिलेलो आहे. अशी निश्चित प्रचिती आल्याने संपूर्ण चित्तशुद्धी झालेला माझा भक्त सर्वांभूती भगवद्भाव पाहू लागतो. त्यामुळे त्याला दिसताना जरी सर्व गोष्टी वेगवेगळ्या दिसत असल्या तरी त्यामागील माझे अस्तित्व जाणवत असल्याने त्याला ती सर्व माझीच रूपे वाटू लागतात. त्यामुळे त्याला कुणाचीही भीती वाटत नाही.
सर्वतोपरी निर्भय असणे हे माझ्या भक्ताचे प्रमुख लक्षण आहे. उद्धवा तू अमाप भाग्याचा असून ज्ञाननिधी कैवल्यदीप असल्याने सर्वाभूती माझीच उपस्थिती असते ही गोष्ट तुला लगेच पटेल.
क्रमश: