महामार्ग प्राधिकरणाने मागविल्या निविदा
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव-गोवा व्हाया चोर्ला हा महामार्ग गोव्याच्या सीमेपर्यंत पूर्णपणे खराब झाला आहे. यामुळे वाहने चालविणेही कठीण झाले होते. महामार्गाच्या दुरुस्तीसाठी महामार्ग प्राधिकरणाने निविदा काढल्या आहेत. दुरुस्ती व देखभालीसाठी बेळगाव ते गोवा राज्याच्या सीमेपर्यंत निविदा काढल्या जाणार असल्याने लवकरच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
बेळगावहून गोव्याला जाण्यासाठी चोर्ला रस्ता जवळचा होता. अनमोड रस्त्याचे काम सुरू असल्याने सर्व वाहतूक चोर्ला मार्गे वळविण्यात आली होती. गोवा राज्याच्या हद्दीपासून म्हापशापर्यंतचा रस्ता उत्तम असला तरी कर्नाटकातील रस्त्याची चाळण झाली होती. कणकुंबीपासून चोर्ला घाटापर्यंतचा रस्ता तर काही ठिकाणी खचला होता. तर काही ठिकाणी भलेमोठे खड्डे पडले होते. काही ठिकाणी खड्डेयांमध्ये पेव्हर्स बसविण्यात आले होते. परंतु अवजड वाहनांनी ते निखळल्याने अपघाताला कारणीभूत ठरत होते. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांसह उद्योजकांतून केली जात होती.
गोवा राज्यातील साखळी ते बेळगाव पर्यंतच्या रस्त्याचे भारतमाला योजनेंतर्गत दुपदरीकरण केले जाणार होते. यासाठी 229 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बेळगावमध्ये येऊन या रस्त्याचे उद्घाटन केले. परंतु हा रस्ता कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या तीन राज्यांच्या वन्यजीव संरक्षित क्षेत्रातून जात असल्यामुळे परवानग्या मिळविण्यासाठी विलंब होत होता. यामुळे रस्त्याची मात्र चाळण झाली होती.
43.48 कि. मी. रस्त्याची दुरुस्ती होणार
दररोज हजारो गोवेकर खरेदीच्या निमित्ताने बेळगावमध्ये येत असताना त्यांना या खड्डेयांमधूनच प्रवास करावा लागत होता. त्यामुळे बेळगावमधील उद्योजक, व्यापारी यांच्यामधूनही नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळे याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दुरुस्तीसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. चार महिन्यांच्या कालावधीत दुरुस्तीचे काम करावे लागणार आहे. एकूण 43.48 कि. मी. रस्त्याची दुरुस्ती केली जाणार आहे. यासाठी 243.69 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रस्त्याची दुरुस्ती झाल्यास तात्पुरत्या स्वरुपात का होईना पण बेळगाव -गोवा प्रवास करणे सोयीचे ठरणार आहे.