गोवा एक्स्प्रेसला जोडणार एलएचबी कोच
बेळगाव : बेळगाव-दिल्ली हा रेल्वेप्रवास आता पुढील काळात आरामदायी होणार आहे. नैर्त्रुत्य रेल्वेने वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्पे्रसला एलएचबी कोच बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. प्रशस्त जागा आणि स्वच्छता यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळली जाणार आहे. भारतीय रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांना एलएचबी कोच बसविण्याचा निर्णय घेतला आहे. एलएचबी कोच म्हणजे स्टीलचा वापर करून तयार करण्यात आलेले अत्याधुनिक रेल्वेचे डबे. यामध्ये स्वच्छ शौचालय, एकाच पत्र्यामध्ये तयार करण्यात आलेली बैठक व्यवस्था, प्रशस्त जागा देण्यात आली आहे. सध्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना एलएचबी कोच जोडण्यात आले होते. वास्को-निजामुद्दीन या लांब पल्ल्याच्या गाडीलाही हा नवा कोच बसवावा, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून होत होती. या मागणीची दखल घेत गोवा एक्स्प्रेसला एलएचबी कोच बसविले जाणार आहे. यामुळे गोवा, लोंढा, बेळगाव, मिरज परिसरातील प्रवाशांना राजधानीपर्यंतचा प्रवास करणे सुखकर होणार आहे. येत्या 15 जूनपासून हा नवा आरामदायी कोच बसविला जाणार आहे.