बेंगळुरात आयोजित राज्य मिनी ऑलिम्पिक 14 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धा
प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे सुरू असलेल्या मिनी ऑलिंपिक राज्यस्तरीय 14 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत मुलांच्या संघाने उत्तर कन्नडा संघाचा 5-1 तर मुलींच्या संघाने हावेरी संघाचा 4-0 असा पराभव करून विजयी सलामी दिली.
बेंगळूर येथे सुरू असलेल्या कर्नाटक राज्य मिनी ऑलिंपिक 14 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात बेळगाव जिल्हा व उत्तर कन्नडा संघात सामना झाला. या सामन्यात चौथ्या मिनिटाला सीनन रॉयने पहिला गोल केला. 14 व्या मिनिटाला टिक्नो परेराने दुसरा गोल केला तर 29 व्या मिनिटाला गौरांगने तिसरा गोल करून 3-0 ची आघाडी मिळवून दिली.
दुसऱया सत्रात 39 व्या मिनिटाला आदमने चौथा तर 40 व्या मिनिटाला उत्तर कन्नडाच्या विरेशने गोल करून बेळगावची आघाडी 1-4 अशी कमी केली. 47 व्या मिनिटाला बेळगावच्या जोश्वाने पाचवा गोल करून 5-1 असा मोठा विजय साकारला.
मुलींच्या गटात झालेल्या पहिल्या सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने हावेरी जिल्हा संघाचा 4-0 असा पराभव केला. या सामन्यात 11 व्या मिनिटाला दिशा डोंगरेच्या पासवर युक्ता पाटीलने पहिला गोल केला. 22 व्या मिनिटाला युक्ता पाटीलच्या पासवर सिल्विया गोम्सने गोल करून 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱया सत्रात 38 व्या मिनिटाला सिल्वियाच्या पासवर युक्ता पाटीलने तिसरा गोल केला तर 41 व्या मिनिटाला आरतीच्या पासवर दिशा डेंगरेने चौथा गोल करून 4-0 ची आघाडी मिळवून देत विजय साजरा केला. या सामन्यात हावेरी संघाला गोल करण्यात अपयश आले.