जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : दोन्ही तालुक्यांसाठी विशेष शिफारस
बेळगाव : बेळगाव व खानापूर तालुक्यातील पिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. दुष्काळामुळे करपलेल्या पिकांची माहिती राज्य सरकारला देण्यात आली आहे. सदर तालुक्यांना दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समाविष्ट करण्यात यावे, यासाठी विशेष प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये अत्यल्प पाऊस झाल्याने या तालुक्यांना दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या यादीतून बेळगाव व खानापूर तालुक्यांना वगळण्यात आले आहे. असे असले तरी त्या दोन्ही तालुक्यांतील कृषी खाते व बागायत खात्याकडून पिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविला आहे.
सर्वेक्षणानुसार बेळगाव व खानापूर तालुक्यातील 37 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारच्या मार्गसूचीनुसार हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. जमिनीतील पाण्याचे प्रमाण व जमिनीतील ओलावा यावरून हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्या मानदंडानुसार सदर माहिती मिळाली आहे. त्यानुसार अहवाल पाठविण्यात आला आहे. या दोन्ही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीमध्ये समावेश करण्यात यावा, यासाठी विशेष शिफारस करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. सध्या पावसाची अपेक्षा ठेवण्यात आली होती. मात्र पाऊस झालेला नाही. त्यामुळे दोन्ही तालुक्यांतील पिके पावसाअभावी करपू लागली आहेत. त्यामुळे उर्वरित पिकांचेही सर्वेक्षण करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.