बुकिंग सुरू नसल्याने प्रवाशांमधून नाराजी : अजून काही दिवस वाट पहावी लागणार
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-नाशिक विमानसेवा 3 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची चिन्हे होती. परंतु अद्याप स्टारएअर कंपनीने बुकिंग सुरू केले नसल्याने विमानसेवा सुरू होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे बेळगावकर विमान प्रवाशांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला आहे.
तांत्रिक कारणाने काही महिन्यांपूर्वी बेळगाव-नाशिक विमान फेरी रद्द करण्यात आली. महाराष्ट्रातील नाशिक शहराला उत्तर कर्नाटकातून विमानसेवा सुरू झाल्याने उत्तम प्रतिसाद मिळत होता. परंतु बेळगाव विमानतळावरील एकएक विमानफेरी रद्द होत गेली. त्यामध्ये नाशिकचाही समावेश होता. ही विमानफेरी रद्द झाल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत होती.
मध्यंतरी विमान प्रवाशांनी नागरी विमान उ•ाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे या विमान फेरीची मागणी केली होती. सिंधिया यांनी फेब्रुवारी महिन्यापासून विमान फेरी पुन्हा सुरू करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. फेब्रुवारी 3 पासून बेळगाव-नाशिक विमानफेरी सुरू होईल, असा अंदाज होता. परंतु अद्यापही स्टार एअरने या मार्गावरील बुकिंग सुरू केलेले नाही. त्यामुळे बेळगाव-नाशिक विमानफेरीसाठी अजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
वर्षभरात 5 विमान कंपन्यांच्या 12 मार्गांवरील विमानसेवा बेळगावमधून बंद झाल्या आहेत. स्पाईस जेट कंपनीने दिल्ली, हैदराबाद, मुंबई, बेंगळूर. ट्रू जेट कंपनीने तिरुपती, कडप्पा, म्हैसूर, हैदराबाद. स्टार एअरने नाशिक व बेंगळूर. इंडिगोने चेन्नई तर अलायन्स एअरने पुणे या शहरांच्या विमानसेवा बंद केल्या. उत्तम प्रवासी संख्या असतानाही विमानसेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
विकासाला बसतेय खिळ
बेळगाव विमानतळावरील अनेक विमानसेवा बंद होत असल्याने याचा परिणाम उद्योग, व्यापार, शिक्षण यासह सर्व क्षेत्रांना बसत आहे. विमान नसल्यामुळे बेळगावच्या प्रगतीला खिळ बसली असून, याचा फायदा शेजारील हुबळी-धारवाड या शहरांना होत आहे. बेळगावमधील विमानसेवा हुबळीला पळविल्या जात असल्याने प्रवाशांनी आपला संताप सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला.