बेळगाव : केएससीए धारवाड विभागीय आयोजित केएससीए चषक 19 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ संघाने हुबळी स्पोर्ट्स क्लब ब संघाचा 224 धावांनी तर हुबळी क्रिकेट अकादमी अ संघाने लक्ष्य अकादमी हुबळीचा 150 धावांनी हरवून प्रत्येकी 4 गुण मिळविले. अर्णव कुंदपने शतक झळकविले. बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ संघाने 50 षटकात 5 बाद 289 धावा केल्या. त्यात आर्यन पुंदपने 8 चौकारांसह 100 धावा करुन शतक झळकविले. सुजल काकतकरने 14 चौकारांसह 88, साई कारेकरने 35, आर्यन नुगानट्टीने 30 धावा केल्या. हुबळी स्पोर्ट्स क्लब ब तर्फे हर्षित शिवापूरने 37 धावात 2 तर प्रज्वल तलवार, विनय मुतगी, विनीत कुणची यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना हुबळी स्पोर्ट्स क्लब ब संघाचा डाव 21.5 षटकात 63 धावात आटोपला. त्यात अभिषेकने 13 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे हर्ष पटेलने 13 धावात 3, सिद्धाप्पा पुजारीने 29 धावात 3, श्रेयश एम. ने 0 धावात 2 तर प्रथम मास्तमर्डीने 1 गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात हुबळी क्रिकेट अकादमीने 47.1 षटकात सर्व बाद 238 धावा केल्या. त्यात मनिकांत बुकीटगारने 8 चौकारांसह 45 अनमोल पागदने 5 चौकारांसह 44, आदित्य खिलारेने 26, आरव ओसवाल व रुषभ पाटील यांनी प्रत्येकी 23, आदित्य उमरानीने 17 तर कृष्णा बंगेराने 14 धावा केल्या. लक्ष्य क्रिकेट अकादमीतर्फे हर्ष माळगीने 48 धावात 4, केदार तोडकरने 42 धावात 3, संदेश पाटीलने 44 धावात 2 तर अथर्व मानेने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना लक्ष्य क्रिकेट अकादमी संघाचा डाव 28.4 षटकात सर्व बाद 88 धावात गारद झाला. त्यात आसीफ मुल्लाने 33, सुप्रित नेजेने 17 धावा केल्या. हुबळी क्रिकेट अकादमीतर्फे वेंकटेश रायबागीने 10 धावात 2, आदित्य खिलारेने 12 धावात 2, रुषभ पाटीलने 29 धावात 2 तर निखिल बडगेरने 1 गडी बाद केला.