तिन्ही बाजूला गतिरोधक घालण्याची मागणी : वेग मर्यादाही ठरविण्याची नितांत आवश्यकता
वार्ताहर /उचगाव
बेळगाव वेंगुर्ले मार्गावरील बेळगुंदी फाटा हा मृत्यूचा सापळा बनला आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने साफ दुर्लक्ष केल्याने या फाट्यावर अजून किती जणांचे बळी हवेत अशा संतप्त प्रतिक्रिया या भागातील नागरिक व प्रवासी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहेत. तातडीने या फाट्यावर गतिरोधक घालून वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. सदर मार्ग कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यांना जोडणारा महत्त्वाचा महामार्ग आहे. याबरोबरच बेळगुंदी, राकस्कोप या भागातून येणारे प्रवासीही या मार्गाशी जोडले जातात. त्यामुळे या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या फाट्यावरच सातत्याने अपघात होत असतात. अनेकांना या ठिकाणी आपले प्राण गमवावे लागले आहेत. यासाठी या ठिकाणी गतिरोधकाची नितांत गरज आहे. मात्र याकडे संबंधित खाते कानाडोळा करत असल्याच्या तक्रारी नागरिकांतून करण्यात येत आहे. गोव्याहून येणारे बॉक्साईटचे ट्रक बेळगाव वेंगुर्ले मार्गावरील या बेळगुंदी फाट्यानजीक रात्रीच्यावेळी येत असतात. बेनकनहळी परिसरात सरकारची गोडावून असल्याने धान्याचा साठा करण्यासाठी आणि तेथून उचल करण्यासाठी रोज ट्रकची वाहतूक मोठ्या प्रमाणे सुरू असते. यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढत आहे. अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी बेळगुंदी अप्रोच रोड, बेळगाव-बाची या रस्त्यावर तिन्ही बाजूला गतिरोधक घालावेत अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे.
हेस्कॉमचे मोठे नुकसान
बेळगुंदी रोडच्या दिशेने येणारे भरधाव ट्रक आतापर्यंत चार वेळा समोरील एका फार्महाऊसमध्ये शिरून हेस्कॉमचे फार मोठे नुकसान झाले आहे. बॉक्साईटने भरलेले वेगवान ट्रक रात्रीच्यावेळी या फार्म हाऊसच्या रस्त्यालगत असलेल्या विद्युत खांबावर आदळून विद्युतखांब, तारा तुटून हेस्कॉमसह फार्महाऊस मालकाचे मोठे नुकसान झाले आहे. सदर ठिकाणी गतिरोधक घातल्यास होणार पुढील अनर्थ टळेल. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने या ठिकाणी गतिरोधक घालावे आणि वाहनांच्या वेगावर मर्यादा ठरवावी अशी मागणी करण्यात येत आहे.