खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन : उपमुख्यमंत्र्यांसह सहा जिह्यातील पालकमंत्री राहणार उपस्थित
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर सर्किट बेंच प्रश्नाची आपणास संपूर्ण माहिती आहे. या प्रश्नी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सहा जिह्याचे पालकमंत्री यांच्यासोबत खंडपीठ कृती समितीची बैठक आयोजीत करण्यात येईल, असे आश्वासन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले. खासदार शिंदे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी समितीने त्यांची भेट घेतली. यावेळी खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने प्रमुख उपस्थित होते.
खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके यांनी खासदार शिंदे यांच्यासह मंडलिक, माने यांचाही सत्कार काला. ॲड. खडके म्हणाले, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर येथील वकील, पक्षकार सर्किट बेंचच्या मागणीसाठी गेली 35 वर्षे लढा देत आहेत. हा लढा आता अंतिम टप्यात आला आहे. मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी जुलै 2022 मध्ये समितीस पत्र पाठविले आहे. यामध्ये मुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक झाल्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंचबाबत निर्णय घेतला जाईल असे कळविले आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट होणे आवश्यक आहे. येत्या दहा दिवसात समिती व सहा जिह्यातील पालकमंत्री यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठकीचे आयोजन करण्यात येईल. या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापूर सर्किट बेंचचा प्रश्न सहा जिह्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. लोकांना जलद व स्वस्त न्याय मिळण्याकरीता कोल्हापूर येथे सर्किट बेंच होणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी समितीचे सचिव ॲड. विजयकुमार ताटे-देशमुख, कोल्हापूर सहकार बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. इंद्रजित चव्हाण, जिल्हा बार असो सहसचिव ॲड. संदीप चौगुले, लोकल ऑडिटर ॲड. संकेत सावर्डेकर उपस्थित होते.