तांदूळ वितरणात कपात, लाभार्थ्यांतून नाराजी
प्रतिनिधी /बेळगाव
गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या रेशनमध्ये कपात करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना आता माणशी 10 किलोऐवजी 6 किलो तांदूळ वितरित होत आहे. यापुढे आता लाभार्थ्यांना दर महिन्याला 6 किलो तांदूळ दिला जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.
सर्वसामान्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून कोरोना काळापासून वाढीव आणि मोफत रेशनचा पुरवठा केला जात होता. केंद्राकडून 5 तर राज्य सरकारकडून 5 किलो असा एकूण 10 किलो तांदूळ माणशी वितरित केला जात होता. मात्र नवीन वर्षात रेशनच्या वितरणात कपात करण्यात आली आहे. आता केंद्र सरकार राज्य सरकारला मोफत धान्याचा पुरवठा करणार आहे. शिवाय लाभार्थ्यांना 10 ऐवजी 6 किलो तांदूळ वितरित केला जाणार आहे. जानेवारी महिन्यात लाभार्थ्यांना प्रत्येकी 5 किलो तर फेब्रुवारी महिन्यात 7 किलो आणि त्यापुढे केवळ 6 किलो तांदूळ वाटप केला जाणार आहे.
आता 6 किलो तांदळावरच समाधान मानावे लागणार
गोरगरीब जनतेचे हाल होऊ नयेत यासाठी मागील 2 वर्षापासून मोफत आणि वाढीव धान्याचा पुरवठा केला जात होता. मात्र आता शासनाने यामध्ये बदल केला आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला मोफत रेशनचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय 10 किलो तांदळावरून 6 किलो तांदूळ वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना आता 6 किलो तांदळावर समाधान मानावे लागणार आहे.
दारिद्र्या रेषेखालील लाभार्थ्यांना दरमहा आता केवळ 6 किलो तांदूळ वितरित केला जाणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडून तांदूळ वितरणात कपात करण्यात आली आहे. बीपीएल आणि अंत्योदय लाभार्थ्यांना याचा फटका बसला आहे. यापूर्वी माणशी 10 किलो तांदूळ दिला जात होता. त्यामुळे लाभार्थ्यांना मुबलक तांदूळ मिळत होता. मात्र आता रेशन वितरण कमी केल्याने लाभार्थ्यांना कमी रेशनवरच समाधान मानावे लागणार आहे.
गैरप्रकारांना आळा बसणार
मागील दोन वर्षात लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात तांदूळ मिळाल्याने गैरप्रकार वाढले होते. काही लाभार्थ्यांनी काळ्या बाजारात तांदळाची विक्री केली होती. तर काहीजण हॉटेल आणि इतर व्यावसायिकांना तांदूळ विकत होते. मात्र अशा सर्व गैरप्रकारांना आळा बसणार आहे.