काहींचा निधी अद्यापही खात्यावर जमा नाही : लाभार्थ्यांमध्ये नाराजी
बेळगाव : राज्य सरकारने महिलांना 2 हजार रुपये गृहलक्ष्मी योजनेंतर्गत लागू केले आहेत. या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र, अद्यापही काही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे लाभार्थ्यांची चौकशीसाठी धडपड सुरू आहे. अन्न व नागरी पुरवठा खाते, रेशन दुकानदार आणि बँकेत चौकशीसाठी लाभार्थ्यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. काँग्रेसने निवडणुकीदरम्यान पाच गॅरंटी योजनांची घोषणा केली होती. त्यानुसार शक्ती, गृहज्योती, अन्नभाग्य आणि आता गृहलक्ष्मीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र, अन्नभाग्य आणि गृहलक्ष्मी योजनेपासून काही लाभार्थी वंचित असल्याचे स्पष्ट होत आहे. काहींनी आधारकार्ड व रेशनकार्ड दुरुस्त करून ते अपडेट करून घेतले आहे. त्यानंतर गृहलक्ष्मीसाठी नोंद केली आहे. मात्र, अद्याप खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे नेमकी काय अडचण आहे? याबाबत लाभार्थी संभ्रमात आहेत.
याबाबत अन्न व नागरी पुरवठा खात्याशी संपर्क साधला असता डीबीटी आणि इतर समस्या असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, बँकेत चौकशी केली असता डीबीटी सुरळीत असल्याचे दाखवून दिले जात आहे. त्यामुळे नेमका निधी अडला कोठे? असा प्रश्नही लाभार्थ्यांतून उपस्थित होऊ लागला आहे. योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने ऑनलाईन नोंदणी केली आहे. मात्र, योजनांचा निधी वेळेवर येत नसल्याने नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. काही लाभार्थ्यांचा अन्नभाग्य योजनेतील ऑगस्ट महिन्यातील निधी जमा झाला आहे तर काहींचा जुलै महिन्याचा निधी अद्याप जमा झालेला नाही. त्यामुळे जुलैचा निधी मिळणार का? असा प्रश्नही लाभार्थ्यांना पडला आहे. तर काही लाभार्थी अन्नभाग्य आणि गृहलक्ष्मी या दोन्ही योजनांपासून वंचित असल्याचे दिसत आहे. तर काहींचा निधी का जमा होत नाही? याबाबत नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
एपीएल कार्डधारक वंचितच
गृहलक्ष्मी योजनेच्या ऑनलाईन नोंदीमध्ये गोंधळ उडाला आहे. त्यामुळे एपीएल लाभार्थ्यांना वंचित रहावे लागत आहे. एपीएल कार्डधारकांनी आपल्या शिधापत्रिकेत आवश्यक ते बदल करून घेतले आहेत. तसेच बँकेत ई-केवायसीदेखील केली आहे. मात्र, गृहलक्ष्मीसाठी ऑनलाईन नोंद करायला गेल्यास त्यांचे रेशनकार्डच लिंक होत नसल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या कार्यालयात चौकशी केल्यास सगळे रेकॉर्ड ‘ओके’ असल्याचेही सांगितले जात आहे. तरीही अर्ज नोंदणी का करून घेतली जात नाही? असा प्रश्न एपीएल कार्डधारकांतून विचारला जात आहे.