रोहित कर्णधार, टीम इंडियाच्या सहा जणांना स्थान
मुंबई : क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलनंतर आयसीसीने या क्रिकेट वर्ल्डकपमधील सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. या बेस्ट वर्ल्डकप प्लेइंग इलेव्हनमध्ये भारताच्या 6 खेळाडूंना स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारा कर्णधार पॅट कमिन्स या संघात नाही. आयसीसीने रोहित शर्माला या संघाचा कर्णधार बनवले आहे. या संघात प्रामुख्याने भारताचे 6, श्रीलंकेचा 1, न्यूझीलंडचा 1, दक्षिण आफ्रिकेचा 1 आणि वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाच्या 2 खेळाडूंचा आयसीसीच्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. वर्ल्डकपच्या बेस्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये भारताकडून विराट कोहली, केएल राहुल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि कर्णधार रोहित शर्मा यांचा समावेश आहे. याशिवाय, श्रीलंकेचा दिलशान मदुशंका, न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल, दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि फिरकीपटू अॅडम झाम्पा यांचा या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश आहे. आयसीसीचा 2023 वर्ल्डकपमधील सर्वोत्तम संघ – क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, डॅरिल मिचेल, केएल राहुल, ग्लेन मॅक्सवेल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, दिलशान मदुशंका, अॅडम झम्पा आणि मोहम्मद शमी.