‘कुत्र्यापासून सावध रहा’ अशी पाटी आपण अनेक बंगल्यांच्या गेटवर पाहिलेली आहे. या सूचनेचा अर्थ असा असतो की या घरात पाळलेला कुत्रा आहे आणि आपण बेसावधपणे गेट उघडून आत गेलात तर तो आपल्यावर हल्ला करुन आपल्याला जखमी करु शकतो. त्यामुळे गेटाबाहेरुनच घराच्या (आणि अर्थातच कुत्र्याच्याही) मालकाला हाक मारुन त्याच्या उपस्थितीतच घरात यावे यासाठी ही सूचनेची पाटी लावलेली असते. तथापि, अशा काही घटना घडलेल्या आहेत, की ज्यामुळे केवळ बाहेरच्या लोकांनी नव्हे, तर कुत्र्यांच्या मालकांनीही त्यांच्यापासून सावध राहण्याची दक्षता घेणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांनीच पाळलेली कुत्री त्यांनाच धोका निर्माण करु शकतात. त्यामुळे सावधपणा आवश्यक आहे.
ऑस्ट्रेलिया देशातील पर्थ या शहरात राहणारी महिला निकिता पिल यांच्यासंबंधी अशी घटना घडलेली आहे. त्यांनी कौतुकाने दोन कुत्री पाळली होतीं. त्या त्यांचे पोटच्या पोराप्रमाणे लाड करीत होत्या. या कुत्र्यांना कशाचीही ददात नव्हती. ही महिला त्यांना अंगाखांद्यांवर खेळवत असे. ही कुत्री या महिलेचा चेहराही चाटत असत. पण एकदा असाच त्यांचा चेहरा चाटत असताना या कुत्र्यांमधील ‘पशू’ जागा झाला आणि त्यांनीं अचानक या महिलेवर हल्ला चढवून तिच्या चेहऱ्याला अनेक चावे घेतले. महिला रक्तबंबाळ झाली. तिला त्वरित रुग्णालयात न्यावे लागले. आजही तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. तात्पर्य काय, तर सर्वांपासूनच सावध राहण्याचा काळ आता आला आहे.