मळा-पणजी येथील प्रकार, पथकाकडून पाहणी,कामाची ठिकाणी बाऊन्सरची अरेरावी
पणजी : मळा-पणजी येथे चुकीच्या आणि बेकायदेशीररित्या डोंगर कापणी होत असल्याची तक्रार पोहचल्यानंतर नगरनियोजन खात्याच्या भरारी पथकाने घटनास्थळी धाव घेत या कामावर रोख लावला. बेकायदेशीरपणे डोंगरकापणी सुरू असल्याचे स्थानिकांना समजताच दक्ष नागरिकांनी नगरनियोजन खात्याशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी भरारी पथक व पोलीस दाखल झाले. याबाबत माहिती अशी की, मळा-पणजी येथे गणेशोत्सवाच्या सुट्टीची संधी साधून बेकायदेशीरपणे डोंगरकापणीचे काम सुरू होते. संबंधितांनी या ठिकाणी बाऊन्सर तैनात करून हे काम करण्याचा घाट घातला होता. स्थानिकांनी विरोध करताच हे बाऊन्सर दादागिरी करू लागल्याने लोकांनी या बाऊन्सरना त्वरित अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. या प्रकाराबाबत या भागाच्या नगरसेविका आदिती चोपडेकर यांनी सांगितले की, गणेशोत्सव सुट्टीचा फायदा घेऊन काही व्यक्ती मळा-पणजी येथे डोंगर कापणीचे काम करीत होते. हा परिसर केंद्र सरकारच्या अधिकारक्षेत्रात येत आहे. त्यांनी या ठिकाणी फलक लावूनही याकडे दुर्लक्ष करून डोंगरकापणीचे काम सुरूच ठेवले होते. लोकांना याबाबत संशय येताच त्यांनी हे थांबविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना बाऊन्सरकरवी दादागिरी करण्यात आली आहे. ही घटना गंभीर असल्याने स्थानिकांकडून पोलिसांत तक्रार दिली जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या. भरारी पथकाने घटनास्थळी धाव घेऊन काम रोखले आहे. डोंगर कापणीवरील कारवाई ही उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकारक्षेत्रात येत असल्याने भरारी पथकाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला जाणार आहे.
जिल्हाधिकारी घेणार गंभीर दखल
मळा-पणजी येथे सुरू करण्यात आलेले बेकायदा डोंगरकापणीचे काम हे कोणतीही परवानगी न घेता सुरू केलेले होते. या ठिकाणी कोणता प्रकल्प येत आहे, हे संबंधितांना विचारल्यावर त्यांच्याकडे उत्तरच नव्हते. चतुर्थी काळात रस्त्यावर शुकशुकाट असल्याने त्याचा फायदा घेऊन ही डोंगरकापणी केली जात होती. स्थानिकांनी नगरनियोजन खात्याला ही माहिती दिल्यानेच कामावर रोख लागला आहे. याबाबतचा अहवाल भरारी पथक तयार करणार असून, हा अहवाल पोहचल्यानंतर जिल्हाधिकारी गंभीर दखल घेण्याची शक्यता आहे.