कॉमेडीक्वीन भारती सिंग हिच्या प्रेग्नन्सीपासून ते तिच्या डिलिव्हरीपर्यंत प्रत्येक गोष्टीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली. एकतर बेबीबम्पसोबत हुनरबाज या शोची होस्ट म्हणून काम करत असतानाचे फोटो तिने शेअर केलेच पण डिलिव्हरीरूममध्ये कळा सोसण्यापासून ते डिस्चार्ज मिळाल्यानंतर बाळासोबत घरी येतानाचा पहिला प्रवासही भारतीने तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावर दाखवला. बाळाचे गोला हे खास नाव ठेवल्याचे सांगत भारती म्हणाली होती की तासन्तास बाळाकडेच बघत असते. आता हे सगळं इतकं ती बाळाबद्दल भरभरून बोलत असताना 12 दिवसांच्या बाळाला घरी सोडून ती हुनरबाज या शोच्या शूटिंगसाठी आल्याचे दिसताच नेटकरी भारतीवर बरसले आहेत. इतकी काय पैशांची गरज होती की बाळाला सोडून शूटिंग सुरू केलंस असं म्हणणाऱया नेटकऱयांना भारतीने सडेतोड उत्तर दिलं आहे.
एका मुलाखतीत भारतीने बाळाला सोडून येण्याचे कारण सांगत ट्रोल करणाऱया नेटकऱयांना उत्तर दिले आहे. या मुलाखतीत भारती तिच्या मातृत्वाचा आनंद, जबाबदारी याबरोबरच ती करत असलेल्या कामाविषयी असलेल्या कमिटमेंट याबाबत सविस्तर बोलली आहे. संकलन – अनुराधा कदम