भोगावती,प्रतिनिधी
Bhogavati Sugar Factory : शाहूनगर परिते ता.करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी पक्की मतदार यादी शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली.यामध्ये राधानगरी व करवीर तालुक्यातील एकूण २७ हजार ५६१ मतदार पात्र ठरले आहेत.आता पुढील पंचवार्षिक निवडणुक प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.मात्र सद्या पावसाळ्याच्या तोंडावरच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला.तर उर्वरित निवडणुक प्रक्रिया व मतदान बिद्री पाठोपाठ लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे.
भोगावती साखर कारखान्याने प्रसिद्ध केलेल्या कच्च्या मतदार यादीतील २ हजार ६८३ सभासदांच्या अपात्रतेवर सर्वपक्षीयांनी हरकत घेतली होती.यावर सुनावणी होऊन पुन्हा ते सभासद अपात्र ठरविण्यात आले आहेत.प्रशासनाने शुक्रवारी पक्की मतदार यादी प्रसिद्ध केली.यामध्ये राधानगरी तालुक्यातील १४ हजार २५५ अ वर्ग व २७७ ब वर्ग असे एकूण १४ हजार ५३२ सभासद पात्र ठरले आहेत.तर करवीर तालुक्यातील १२ हजार ८१० अ वर्ग व २१७ ब वर्ग यासह व्यक्तीगत सभासद २ असे एकूण १३ हजार ०२९ सभासद पात्र ठरले आहेत.
आता निवडणुक अधिकाऱ्यांची नियुक्ती व तेथुन पुढे निवडणुक कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.मात्र पावसाळ्याच्या तोंडावर व भौगोलिक नैसर्गिक परिस्थिती लक्षात घेता ही निवडणुक अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण या निवडणुकीसाठी सहकार विभागाकडे सक्षम निवडणुक अधिकारी सध्या तरी नाही.काही अधिकारी अन्य निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये अडकले आहेत.त्यामुळे महसुल विभागाकडील प्रांत स्तरावरील निवडणुक अधिकारी शोधावा लागणार आहे.त्यामुळे निवडणुक आणि मतदान सप्टेंबरमध्येच होण्याची दाट शक्यता आहे.सध्या निवडणुक कार्यक्रम जाहीर करुन उर्वरित निवडणुक प्रक्रिया सप्टेबरमध्ये पार पडण्याची शक्यता आहे.