बेळगाव : भुतरामट्टी येथे दसरा उत्सवानिमित्त आयोजित खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत निपाणी युनायटेड संघाने चिपाडी ब्रदर्स संघाचा 2-1 अशा सेटमध्ये पराभव करून भुतरामट्टी चषक पटकाविला. तर काकती जिओ संघाने तृतीय क्रमांक पटकाविले. भुतरामट्टी येथील कन्नड शाळेच्या मैदानावरती आयोजित खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत जवळपास 14 संघानी भाग घेतला होता. या स्पर्धेत पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात चिपाडे ब्रदर्स संघाने भुतरामट्टी ब संघाचा 15-10, 12-15, 15-13 अशा सेटमध्ये तर दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात निपाणी युनायटेडने काकती जिओ संघाचा 15-10, 15-12 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या क्रमांकासाठी खेळविण्यात आलेल्या सामन्यात काकती जिओ संघाने भुतरामट्टी ब संघाचा 15-10, 15-12 अशा सेटमध्ये पराभव करून तिसरा क्रमांक पटकाविला.
अंतिम सामन्यात निपाणी युनायटेडने चिपाडी ब्रदर्सचा 25-11, 22-25, 15-12 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले. सामन्यानंतर ग्रा. पं. सदस्य बाळकृष्ण पाटील, मारूती चौगला, विठ्ठल पाटील, एम. जी. चौगला, भिमराव नाईक, राजु चौगला आदी मान्यवरांच्याहस्ते विजेत्या निपाणी संघाला आकर्षक चषक व 15 हजार रूपये रोख तर उपविजेत्या चिपाडी संघाला 7500 व चषक देऊन तर तिसरा क्रमांक पटकाविलेल्या काकती जिओ संघाला 3 हजार रूपये रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. तर उत्कृष्ट मॅशर म्हणून संकेत पाटील निपाणी यांना चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून हर्षवर्धन शिंगाडे, शंकर कोलकार, उमेश मजुकर, राजु चौगला यांनी काम पाहिले.