भारतातील ‘जी20’ शिखर परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन रविवारी व्हिएतनामला रवाना झाले. दोन्ही राष्ट्रांमधील संबंध वाढविण्याच्या दृष्टीने हा दौरा आखण्यात आला आहे. बायडेन हे व्हिएतनाममधील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस गुयेन फु ट्राँग आणि इतर प्रमुख नेत्यांची भेट घेतील आणि दोन्ही राष्ट्रांमधील सहकार्य आणखी वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा करतील.
बायडेन यांच्या व्हिएतनाम भेटीदरम्यान तंत्रज्ञान केद्रीत आणि नवकल्पनांतून जोर मिळणाऱ्या व्हिएतनामी अर्थव्यवस्थेच्या वाढीस चालना देण्याच्या दृष्टीने सधी पडताळून पाहणे, शैक्षणिक देवाणघेवाण आणि कार्यबल विकास कार्यक्रमांद्वारे लोकांचे संबंध वाढवणे, हवामान बदलाशी लढा देणे आणि त्या प्रदेशात समृद्धी, स्थिरता आणि शांतता वाढीस लावणे ही मुख्य उद्दिष्टे राहणार आहेत.
‘जी20’ तोडगा काढण्यास सक्षम असल्याचे सिद्ध : बायडेन
जो बायडेन यांच्या ‘जी20’ शिखर परिषदेच्या निमित्तानं झालेल्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्याने भारत व अमेरिका यांच्यातील संबंध आणखी दृढ करण्यास मोलाची मदत झालेली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच्या त्यांच्या द्विपक्षीय बैठकीचा समावेश राहिला. त्याशिवाय बायडेन भारताच्या अध्यक्षतेखालील ‘जी20’ शिखर परिषदेत सहभागी झाले…पूर्वी ‘ट्विटर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘एक्स’वरील एक ‘पोस्ट’मध्ये बायडेन यांनी म्हटले आहे, ‘या क्षणी जागतिक अर्थव्यवस्था हवामान बदलाचे संकट, नाजूकपणा आणि संघर्षाच्या आघातांनी ग्रासलेली असताना यावर्षीच्या शिखर परिषदेने हे सिद्ध केले की, ‘जी20’ अजूनही आमच्या सर्वांत गंभीर समस्यांवर तोडगा काढू शकते.