10 दिवसात 1010 कुटुंबांची नोंद : ग्रा पं. सदस्य, पीडीओ, कर्मचाऱ्यांचे प्रयत्न फळाला
वार्ताहर /नंदगड
प्रत्येक कुटुंबातील प्रमुख महिलेला प्रति महिना दोन हजार रुपये गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी सर्वत्र नोंदणी सुरू आहे. सर्व्हर डाऊनच्या नावाखाली नोंदणीसाठी प्रत्येकाकडून शंभर ते दीडशे रुपये वसूल करण्यात येत असल्याची सर्वत्र तक्रार आहे. परंतु खानापूर तालुक्यातील बिडी ग्रामपंचायतने मोफत नोंदणी करण्याचा सपाटा सुरू केल्याने नागरिकांची बऱ्यापैकी सोय झाली आहे. गृहलक्ष्मी योजनेची नोंदणीला सरकारकडून दि. 19 जुलैपासून सुरुवात झाली. बिडी ग्रामपंचायतने दि. 21 पासून या योजनेची नोंदणी करण्यास सुरुवात केली. आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना संबंधित योजनेचा अॅप त्यांच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून दिला. त्यानंतर प्रत्येक वार्डामध्ये एक एक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार आपल्या सहा प्रभागांमध्ये कर्मचाऱ्यांना या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी विशेष व्यवस्था केली. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी सकाळी सात वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत येणाऱ्या सर्व कुटुंबधारकांची नोंदणी करून घेतली. त्यामुळे 10 दिवसात आतापर्यंत 1010 लाभार्थींची नोंदणी केली आहे. शिवाय बाहेर ग्राम वनमध्येही काही लोकांची नोंदणी सुरू आहे. त्यामुळे केवळ मोजकेच लोक अद्याप या योजनेपासून वंचित आहेत. ज्या लाभार्थींची बँक पासबुकची केवायसी झालेली नाही. काही लाभार्थींच्या आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर लिंक नाही. काही लाभार्थींचे कुटुंबप्रमुख हे पुरुष आहेत. त्यामुळे असे लोक आपले कार्ड दुरुस्त करून आणल्यानंतर व कागदपत्रे व्यवस्थित दिल्यानंतर त्यांनाही या योजनेत समावेश करून घेतले जाणार आहे. परंतु सर्रास 80 टक्केहून अधिक लाभार्थींची नोंदणी झाल्याने आता गर्दी मात्र बऱ्याच प्रमाणात ओसरली आहे. सध्या उर्वरित गृहलक्ष्मींची नोंद करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात दोन ठिकाणी काउंटर ठेवण्यात आले आहेत.
बेळगाव जिह्यात दि. 27 पर्यंत गृहलक्ष्मी योजनेसाठी नोंदणी झालेले ग्रा.पं. लाभार्थी
- बिडी(ता. खानापूर) 1010
- मुगळी(ता. चिक्कोडी) 917
- अर्टाळ (ता. अथणी) 916
- नागरमुनोळी (ता. चिकोडी) 909
- हळेतोरगल (ता. रामदुर्ग) 850
- नवलीहाळ (ता. चिकोडी) 836
- चिकलव्हाळ(ता. चिकोडी). .808
- येडूर (ता. चिकोडी) 792
- नंदिकुरळी (ता. रायबाग) 789
- काकती (ता. बेळगांव) 785
जनतेकडून मिळालेला प्रतिसाद हेच आपले यश
सरकारी योजना या जनतेपर्यंत पोहोचवाव्यात त्यासाठी ग्रामपंचायत हे पण एक माध्यमच आहे. जनतेने मला निवडून देऊन अध्यक्ष बनवले. जनतेचा सेवक म्हणूनच ग्रा. पं. सदस्य व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन काम करीत आहे. स्वत: अध्यक्ष म्हणून घरात न बसता गल्लोगल्ली फिरून सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी जनतेला आवाहन केले आहे. त्यामुळेच आपण जिह्यात या योजनेच्या नोंदणीचा टार्गेट लवकर पूर्ण केले आहे.
– संतोष काशीलकर, ग्रा. पं. अध्यक्ष