रॅलीमध्ये बेळगाव, बैलहोंगल, सौंदत्ती, रामदुर्ग तालुक्यातील हजारो सरकारी कर्मचारी सहभागी
बेळगाव : नवीन पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लाभदायक नसल्याने केंद्र तसेच राज्य सरकारने जुनी पेन्शन स्कीम पुन्हा लागू करावी, या मागणीसाठी बुधवारी बेळगाव शहरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली. सध्या देशभर सुरू असणाऱ्या ‘एनपीएस हटाव’ या भारत रॅलीचे बुधवारी बेळगावमध्ये आगमन झाले. या रॅलीमध्ये बेळगाव, बैलहोंगल, सौंदत्ती व रामदुर्ग तालुक्यातील हजारो सरकारी कर्मचारी सहभागी झाले होते. नव्या पेन्शन स्कीममुळे कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यांना अनेक योजनांपासून मुकावे लागत असल्याने ही पेन्शन स्कीम रद्द करून जुनीच पेन्शन स्कीम सुरू ठेवावी, अशी मागणी देशभर केली जात आहे. यासाठी देशभरात चार ठिकाणांहून भारत रॅली काढली जात आहे. यापैकी एक रॅली बुधवारी बेळगावमध्ये दाखल झाली. या रॅलीमध्ये शालेय शिक्षक तसेच विविध विभागांचे कर्मचारी सहभागी झाले.
बुधवारी सकाळी राणी चन्नम्मा चौकापासून बाईक रॅलीला सुरुवात झाली. नेहरुनगर मार्गे केपीटीसीएल सभागृहापर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. यानंतर झालेल्या बैठकीमध्ये राज्य तसेच देशपातळीवरील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार हेब्बळ्ळी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. राज्य सेक्रेटरी चंद्रशेखर नुब्बळ्ळी यांनी एनपीएस कर्मचाऱ्यांसाठी का अयोग्य आहे? याविषयी माहिती दिली. राज्याध्यक्ष नागेश तसेच शिक्षक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरीगार यांनीही मार्गदर्शन केले. पेन्शन योजनेसोबतच केरळ राज्याच्या धर्तीवर कर्नाटकातील सरकारी शाळांमधील शिक्षकांना वेतनवाढ करण्याची मागणी करण्यात आली. भारत रॅली बेळगावनंतर खानापूर व कित्तूर येथे जाणार आहे. त्यानंतर दिल्ली येथे मोठी सभा होणार असून एनपीएसला विरोध दर्शविला जाणार आहे.