हडफडे येथील घटना : सुदैवाने मुले बचावली : गुजरात येथील कारचालक पर्यटकावर गुन्हा दाखल
म्हापसा : शुक्रवारी सकाळी आपल्या मुलांना हडफडे येथील सेंट जोसेफ हायस्कुलात सोडण्यासाठी अॅक्टिवा स्कूटरवरून जात असता मागाहून आलेल्या भरधाव पर्यटक ाच्या कारने स्कूटरला जोरदार धडक दिल्याने जॉन डिसोझा गंभीर जखमी झाला. नंतर जॉनला उपचारासाठी म्हापशातील इस्पितळात नेत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाल्याची माहिती हणजूण पोलीस सूत्रांनी दिली. मात्र सुदैवाने जॉनसोबत स्कूटरवर असलेली दोन्ही मुले आश्चर्यकारकरित्या बचावली. कारचालक पौषाक शाह (वडोदरा-गुजरात) याला या अपघातास कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून हणजूण पोलिसांकडून ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हणजूण पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, रावतावाडो-नागवा येथील रहिवासी जॉन डिसोझा नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी पावणेआठ वा. आपल्या दोन विद्यार्थी मुलांना या भागातील सेंट जोसेफ हायस्कुलात सोडण्यासाठी अॅक्टिवा स्कूटरवरून(क्र: जीए-03-एए-8091) हडफडेच्या दिशेने जात असताना येथील हॉली त्रिनीटी चर्च जवळच्या रस्त्यात मागाहून भरधाव वेगाने आलेल्या पर्यटकाच्या कारने (जीए-03-डब्लू-7817) त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेनिशी जॉन डिसोझा आपल्या विद्यार्थी मुलांसह जोरात रस्त्यात आपटले व त्यांच्या डोक्मयाला जबर मार बसला. तसेच जॉनच्या मागे दुचाकीवर बसलेल्या त्यांच्या दोन्ही मुलांनाही मुका मार बसला. मात्र या गंभीर अपघातातून दोन्ही मुले आश्चर्यकारित्या बचावली. दुचाकी चालक जॉन डिसोझा याला गंभीर जखमी अवस्थेत म्हापशाच्या जिल्हा इस्पितळात ऊग्णवाहिकेतून उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे गावात शोककळा पसरली आहे. कारचालक पौषाक शाह (वडोदरा-गुजरात) याला निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकी चालकाच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून हणजूण पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले असून पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी व निरीक्षक प्रशल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.