वृत्तसंस्था /श्रीनगर
येत्या शनिवारपासून सुरू होणाऱ्या हांगझाऊ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी श्रीनगरचे बिल्किस मिर यांची कॅनोइंग आणि कायकिंग या क्रीडा प्रकारासाठी पंच म्हणून नियुक्ती केली आहे. श्रीनगर परिसरातील जलक्रीडा प्रकारामध्ये हा बहुमान मिळवणाऱ्या बिल्किस मिर या पहिल्या भारतीय महिला आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी वरिष्ठांच्या कॅनॉइंग आणि कायकिंग या जलक्रीडा प्रकारातील पंच पॅनेलमध्ये समावेश केलेल्या मिर या पहिल्या भारतीय पंच आहेत. कायकिंग, कॅनॉइंग आणि कॅनो स्प्रिंट्स या क्रीडा प्रकारातील स्पर्धकांच्या फिनिशिंग पॉईंट ठिकाणी बिल्किस मिर या प्रमुख पंच म्हणून कार्यरत राहतील. गेल्या चार वर्षांच्या कालावधीत जम्मू-काश्मीरमध्ये जलक्रीडा प्रकाराला अधिक प्राधान्य दिल्याने या परिसरातील अनेक स्पर्धक दजेंदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. हांगझाऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पथक अधिक पदकांची कमाई करेल असा विश्वास मिर यांनी व्यक्त केला.