काँग्रेस उमेदवाराने मागे घेतला अर्ज
वृत्तसंस्था / कोहिमा
नागालँडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱया मतदानापूर्वीच भाजपचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. अकुलुतो मतदारसंघातील भाजप उमेदवार काजेतो किनिमी यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात उभे एकमात्र काँग्रेसचे उमेदवार खेकोश सुमी यांनी स्वतःचा अजं मागे घेतला आहे. नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
अकुलुतो मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार एन. खेकाशे सुमी यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. नागालँडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारीसाठी 10 फेब्रुवारी हा अखेरचा दिवस होता अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. शशांक शेखर यांनी दिली आहे.
दुसऱया कार्यकाळासाठी अकुलुतोच्या लोकांचे बिनविरोध प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने सन्मान झाल्याचे वाटत आहे. मी या विशेषाधिकारासाठी ईश्वराचे आभार मानतो आणि स्वतःच्या समर्थक, हितचिंतक, अकुलुतोमधील भाजपचे सहकारी आणि नागालँडमधील भाजप कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो. हा विजय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावरील लोकांचा विश्वास दर्शविणारा असल्याचे किनिमी यांनी म्हटले आहे. एनडीपीपी आणि भाजपने राज्यात निवडणुकीकरता आघाडी केली आहे. नागालँडच्या निवडणुकीचा निकाल 2 मार्च रोजी जाहीर होणार आहे.