बिहारमधील घटना : नितीश सरकारविरोधात मोर्चा
वृत्तसंस्था /पाटणा
बिहारमध्ये नितीश सरकारविरोधात मोर्चा काढणाऱ्या भाजप नेते विजय सिंह यांचा पोलिसांच्या लाठीमारामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडल्याने राजकीय वातावरण तप्त झाले आहे. बिहार विधानसभेत गोंधळ झाल्यानंतर गुऊवारी गांधी मैदानातून मोर्चा काढणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. यामध्ये एका भाजप नेत्याचा मृत्यू झाला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि पाण्याच्या तोफांचा वापर केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आंदोलक संतप्त झाल्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यात जहानाबादचे भाजप जिल्हा सरचिटणीस विजय कुमार सिंह पोलिसांच्या लाठीमारात गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना ऊग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. भाजप नेत्याच्या मृत्यूला पक्षाचे राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. जेहानाबादच्या नेत्याची हत्या करण्यात आल्याचे भाजप नेत्याने म्हटले आहे. यासाठी त्यांनी नितीश सरकारला जबाबदार धरत त्यांना ‘ममता बॅनर्जी-2’ असेही संबोधले आहे. या घटनेनंतर विरोधी पक्षनेते विजय सिन्हा विधानसभेच्या आवारात धरणे धरून बसले आहेत. भाजपने मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दुसरीकडे याप्रकरणी भाजप शुक्रवारी राजभवनावर मोर्चा काढणार आहे.