लुकआउट सर्क्युलर जारी : विदेशात पलायन करण्याचा संशय : विमानतळावर अलर्ट
वृत्तसंस्था/ भटिंडा
पंजाबच्या भटिंडा भूखंड वाटप प्रकरणात अडकलेले पंजाबचे माजी अर्थमंत्री तसेच भाजप नेते मनप्रीत बादल हे विदेशात पळ काढतील असा संशय आहे. याचमुळे त्यांच्या विरोधात लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मनप्रीत बादल यांनी सत्र न्यायालयात दाखल केलेला अंतरिम जामिनासाठीचा अर्ज मागे घेतला आहे.
मनप्रीत बादल यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे. मनप्रीत यांच्या शोधाकरता दक्षता विभागाने सोमवारी मुक्तसर येथील बादल यांच्या निवासस्थानी छापा टाकला, परंतु तेथे मनप्रीत आढळून आलेले नाहीत. यांच्या विरोधात भूखंड वाटप प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मनप्रीत याच्यासोबत आणखी 5 जणांना आरोपी करण्यात आले आहे. यातील 3 आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे.
बादल यांनी अर्थमंत्री असताना भटिंडातील 2 भूखंड हडपल्याचा आरोप आहे. अधिकारी अन् कर्मचाऱ्यांशी संगनमत करून या भूखंडांचा बनावट लिलाव करविण्यात आला. बोलीदरम्यान भूखंडाचे नकाशे अपलोड करण्यात आले नाहीत, जेणेकरून भूखंड कुठल्या ठिकाणचे आहेत हे कळू नये. तसेच नागरी वापराच्या भूखंडाला क्यावसायिक स्वरुपाचे दाखविण्यात आल्याने कुणी हे भूखंड खरेदी केले नव्हते. दुसऱ्यांदा लिलाव प्रक्रिया करविण्यात आली, यात बादल यांच्या निकटवर्तीयांनी हे भूखंड खरेदी केले. काही काळानंतर हे दोन्ही भूखंड बादल यांना कमी दरात विकण्यात आले होते असा आरोप आहे.
स्वपक्षीय नेत्याच्या तक्रारीमुळे अडचणत
बादल यांच्या विरोधात भटिंडाचे माजी अमादर सरुप चंद सिंगला यांनी तक्रार केली होती. परंतु तेव्हा बाल हे काँग्रेस सरकारमध्ये मंत्री होते आणि सिंगला हे अकाली दलाचे नेते होते. यानंतर सिंगला हे भाजपमध्ये सामील झाले. तर बादल हे देखील काही काळानंतर भाजपमध्ये दाखल झाले होते.