राय : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नेतृत्वाची 9 वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने कुडतरी मतदारसंघातही लोकांच्या गाठीभेटी घेणे चालूच ठेवलेले असून सोमवारी माजी केंद्रीयमंत्री एदुआर्द फालेरो यांची पक्षाने भेट घेऊन त्यांना भाजपाच्या कार्याची पुस्तिका भेट दिली. भाजपाच्या एसटी मोर्चाचे उपाध्यक्ष अँथोनी बार्बोझा तसेच महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ. स्नेहा भागवत यांनी सोमवारी केंद्रीयमंत्री एदुआर्द फालेरो यांची भेट घेतली आणि पक्षाच्या कार्याची माहिती दिली. कुडतरी मतदारसंघात आपले हातपाय फैलावण्यासाठी भारतीय जनता पक्षाने महाजनसंपर्क अभियानाचा आधार घेतलेला आहे. गेले 5 दिवस कुडतरी मतदारसंघात पक्षाने महाजनसंपर्क अभियान नेटाने चालू ठेवलेले आहे. ज्या पद्धतीने ही मोहीम चालू आहे ती पाहता जणू ‘कुडतरी मिशन’ हाती घेतल्यासारखे सध्यातरी वाटत असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
तीन दिवसापूर्वी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी कुडतरी मतदारसंघातील काही महत्वाच्या नेत्यांची भेट घेतली होती. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री निलेश काब्राल आणि पंचायतमंत्री माविन गुदिन्हो कुडतरी मतदारसंघात लोकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी संपर्क साधणार अशी माहिती स्थानिक नेते अँथोनी बार्बोझा यांनी दिली. फातोर्डाचे माजी आमदार आणि प्रदेश भाजप समितीचे सरचिटणीस दामू नाईक, महिला मोर्चा उपाध्यक्षा डॉ. स्नेहा भागवत तसेच कुडतरी मतदारसंघाचे अध्यक्ष निळकंठ एकावडे यांनीही या मोहिमेत भाग घेतला होता. भाजप प्रदेश समितीचे आयोजन सचिव सर्वानंद भगत यांनी कुडतरी मतदारसंघाचाच भाग असलेल्या घोगळ हाऊसिंग बोर्ड येथील महत्वाचे स्थानिक नेते अॅड. सुभाष काणेकर यांच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मंडळाध्यक्ष निळकंठ एकावडे, महिला विभागाच्या अध्यक्षा बबिता बोरकर, अनंत रेडकर यांचा समावेश होता. कुडतरी मतदारसंघात भाजपाला जो प्रतिसाद मिळत आहे तो पाहिल्यास येत्या निवडणुकीत या मतदारसंघात कमळ फुलेल असा विश्वास श्री. भगत यांनी व्यक्त केला.