शेतकऱ्यांसह मोर्चा काढून केला निषेध
बेळगाव : शेतकऱ्यांविरोधी काम करणाऱ्या काँग्रेस सरकारविरोधात शुक्रवारी भाजपने जोरदार निदर्शने केली. मागील सहा महिन्यात राज्यातील जनतेची केवळ दिशाभूल केली जात असून शेतकऱ्यांना वीज नसल्याने तो हवालदिल झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असा घणाघात भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर केला. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी बेळगाव भाजप महानगरतर्फे शुक्रवारी चन्नम्मा सर्कलपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना कडाडी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. शेतकऱ्यांना वीजपंपासाठी वीजखांब व ट्रान्स्फॉर्मरचे पैसे स्वत:च खर्च करावे लागत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला असून राज्य सरकारचे हे अपयश असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांसोबत झटापट
चन्नम्मा सर्कलपासून जिल्हाधिकारी कार्यालय कंपाऊंडपर्यंत मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी कार्यकर्ते तसेच नेत्यांना अटकाव केला. यामुळे भाजप कार्यकर्ते व पोलिसांमध्ये झटापट झाली. परंतु, पोलिसांनी कार्यालयाच्या आवारात प्रवेश न दिल्याने रस्त्यावरच बसून भाजपच्या नेत्यांनी राज्य सरकारविरोधात आंदोलन केले. यावेळी शेतकरी तसेच भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खासदार मंगला अंगडी, विधान परिषद माजी सदस्य महांतेश कवटगीमठ, माजी आमदार अनिल बेनके, संजय पाटील व इतर उपस्थित होते.