ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भाजपने पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून 6 वर्षांसाठी निलंबित केले आहे. तर मीडिया प्रभारी नवीन जिंदाल यांना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही शोमध्ये बोलताना मोहम्मद पैगंबरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यानंतर देशात ठिकठिकाणी मुस्लिम संघटनांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. जिंदाल यांनी याच मुद्द्यावर काही वादग्रस्त ट्विट केले होते. त्यामुळे भाजपने नुपूर शर्मा यांच्यासह नवीन जिंदाल यांच्यावरही कारवाई केली.
भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांचा पक्ष कोणत्याही विचारसरणीच्या किंवा धर्माचा अपमान करणाऱ्या किंवा अपमान करणाऱ्या कोणत्याही विचारधारेच्या विरोधात आहे. भाजप अशा लोकांना आणि त्यांच्या विचारांना प्रोत्साहन देत नाही. भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात प्रत्येक धर्म या मातीत रूजला व वाढला आहे. भाजप प्रत्येक धर्माचा सन्मान करतो.कोणत्याही धर्मातील पूजनीय व्यक्तींचा अपमान भाजपला मान्य नाही, असेही ते म्हणाले.