हिमाल प्रदेशसाठी घोषणापत्र सादर ः महिलांना नोकऱयांमध्ये 33 टक्के आरक्षण ः विद्यार्थिनींना स्कुटी
वृत्तसंस्था / शिमला
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रविवारी स्वतःचे घोषणापत्र सादर केले आहे. भाजपने घोषणापत्राला यावेळी संकल्पपत्र नाव दिले आहे. भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी पक्षाचे संकल्पपत्र जाहीर केले आहे. राज्यात भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास समान नागरिक संहिता लागू केली जाणार आहे. तसेच वक्फ बोर्डाशी निगडित सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण केल्यावर न्यायालयीन कक्षेत त्यांची सत्यता पडताळली जाणार आहे. या मालमत्तांचा गैरवापर होत असल्यास कारवाई करण्यात येणार आहे. महिलांना रोजगारात 33 टक्के आरक्षण आणि विद्यार्थिनींना सायकल तसेच स्कुटी मोफत देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. तसेच वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत देण्याची तयारी दर्शविली आहे.
हिमाचलमध्ये भाजपने सत्ता राखल्यास समान नागरी संहिता लागू करण्यात येईल. याकरता समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच अन्नदाता सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱयाला तीन हजार रुपये वर्षाला देण्यात येतील. राज्यात 8 लाखाहून अधिक रोजगार उपलब्ध करण्यात येणार असून सर्व गावांना पक्क्या रस्त्यांशी जोडण्यात येईल. धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी 12 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्याची घोषणा भाजप अध्यक्षांनी केली आहे.
राज्यात 5 नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली जाणार असून मोबाइल व्हॅनची संख्या दुप्पट करण्यात येईल. हिम स्टार्टअप योजना सुरू केली जाईल, याकरता 900 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद असणार आहे. सैनिकांच्या कुटुंबाला होणारी आर्थिक मदत वाढविण्यात येईल असे आश्वासन भाजपने राज्यातील जनतेला दिले आहे.
महिलांसाठी विशेष घोषणा
राज्यात वर्षाला तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन यात नमूद आहे. इयत्ता बारावीमध्ये यश मिळविलेल्या 5 हजार विद्यार्थिनींना अडीच हजार रुपयांची मासिक शिष्यवृत्ती देण्यात येईल. सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना सायकल तसेच 12 वीनंतर स्कुटी देण्यात येणार आहे. महिलांना रोजगारात 33 टक्के आरक्षण प्रदान केले जाणार आहे. मुख्यमंत्री शगून योजनेच्या अंतर्गत दारिद्रय़रेषेखालील कुटुंबातील मुलीच्या विवाहासाठी 51 हजार रुपयांची मदत करण्यात येईल. महिलांना व्याजमुक्त कर्ज प्रदान करण्याचे आश्वासन यात सामील आहे. गरोदर महिलांना 25 हजार रुपयांची मदत करत मूल सुरक्षित जन्माला येईल याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
आश्वासनांहून अधिक काम
भाजपने राज्यातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासह त्याहून अधिक काम केले आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत हजारो लोकांना घर उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावा भाजप अध्यक्ष नड्डा यांनी केला आहे. संकल्पपत्र सादरीकरणावेळी मुख्यमंत्री जयराम ठाकूर, हिमाचल प्रदेश भाजप अध्यक्ष सुरेश कश्यप आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर उपस्थित होते.
काँग्रेसच्या घोषणापत्रात ओपीएस केंद्रस्थानी
काँग्रेसने शनिवारी स्वतःचे घोषणापत्र जारी केले होते. काँग्रेसने याला प्रतिज्ञापत्र नाव दिले आहे. काँग्रेसने जुनी पेन्शन व्यवस्था लागू करण्याच्या आश्वासनासह 1 लाख लोकांना पहिल्या कॅबिनेट बैठकीत रोजगार मिळवून देण्याचा निर्णय घेण्याची घोषणा केली आहे.