ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटात चढाओढ सुरू असतानाच शिंदे गटाला वांदे-कुर्ला संकुलातील बीकेसी मैदानावर मेळावा घेण्याची परवानगी एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे. तर बीकेसीच्या दुसऱ्या मैदानासाठी उद्धव ठाकरेंनी केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे.
दरवर्षी दादरमधील शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा घेतला जातो. मात्र, यंदा एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत दोन गट पडले. दोन्ही गटाने पालिकेकडे शिवाजी पार्कवरील मैदानासाठी अर्ज केला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन पालिकेने कोणत्याही गटाला मेळाव्यासाठी मैदान उपलब्ध करुन दिले नाही. त्यानंतर दोन्ही गटांनी बीकेसीतील मैदानांसाठी अर्ज केला.
अधिक वाचा : राज्यात लम्पी लसीचा तुटवडा नाही, पशुसंवर्धनमंत्र्यांचा दावा
बीकेसीमध्ये दोन मैदानं आहेत. यातील एमएमआरडीच्या मुख्य मैदानासाठी शिंदे गटाकून अर्ज दाखल करण्यात आला होता. प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य या नियमाअंतर्गत एमएमआरडीएकडून शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून बीकेसीतील कॅनरा बँकेजवळच्या मैदानासाठी अर्ज करण्यात आला होता. पण संबंधित मैदान आधीच एका कंपनीकडून कार्यक्रमासाठी आरक्षित केल्यानं ठाकरे गटाची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा मेळावा कुठे होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.