आरोग्य-शिक्षण स्थायी समितीच्या बैठकीत सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील कचऱ्याच्या विल्हेवारीसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. मात्र शहरातील कचरा अजूनही कमी होत नाही याला सर्वस्वी कंत्राटदार जबाबदार आहेत. कामगारांची संख्या अधिक दाखवून ते रक्कम उकळत आहेत. त्यामुळे ठेकेदार वाय. बी. गोल्लर आणि एन. डी. पाटील यांच्याकडील कंत्राट काढून घेऊन त्या दोघांनाही ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे, असे आरोग्य व शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष रवी धोत्रे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
महापालिकेतील आरोग्य व शिक्षण स्थायी समितीची बैठक झाली. त्यामध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केली आहे. महापालिकेने शहरातील कचरा गोळा करण्याचे काम कंत्राटदारांना दिले आहे. मात्र या दोन कंत्राटदारांबद्दल तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील काम काढून घ्यावे, असे सांगण्यात आले. यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांना नोटीस दिली असून त्यांचे काम थांबवू, असे आश्वासन दिले आहे.
सफाई कर्मचाऱ्यांना कमी वेतन देऊन महापालिकेकडून मात्र अधिक वेतन घेतले जात आहे. सफाई कर्मचाऱ्यांचे बँक पासबुक, एटीएमकार्डदेखील या कंत्राटदारांकडेच आहेत. एकूणच हे कंत्राटदार महापालिकेला अंधारात ठेवून सफाई कर्मचाऱ्यांची पिळवणूक करत असल्याचा आरोपही बैठकीत करण्यात आला. यावेळी प्रभागाच्या आरोग्य निरीक्षकांनाही चांगलेच धारेवर धरण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत यापुढे या दोघांना काम देऊ नये, असे बैठकीत ठरविण्यात आले. यावेळी संबंधित ठेकेदारांनाही बोलाविण्यात आले होते. त्यावेळी नगरसेवकांनी त्यांच्या समोरच अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
या बैठकीला नगरसेवक अॅड. हणमंत कोंगाली, नगरसेवक शंकर पाटील यांसह इतर नगरसेवक, महापालिका उपायुक्त रेश्मा तालिकोटी, भाग्यश्री हुग्गी, आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे, साहाय्यक अभियंते हणमंत कलादगी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.