बलुचिस्तान प्रांतातील घटनेत 130 हून अधिक जखमी
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानाच्या बलुचिस्तान प्रांतात शुक्रवारी एका मिरवणुकीत घडविलेल्या भीषण स्फोटात किमान 52 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे किमान 130 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इस्लामचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. ठार झालेल्यांमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. मदीना मशिदीजवळ हा स्फोट झाल्याची माहितीही पाकिस्तानच्या प्रशासनाने दिली आहे.
बलुचिस्तान प्रांताच्या मस्तुंग जिल्ह्यात ही घटना घडल्याची माहिती देण्यात आली. घटनास्थळी ईद मिलाद उन् नबी (पैगंबरांचा जन्मदिन) साजरा करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. एका मिरवणुकीचे आयोजनही करण्यात आले होते. मिरवणूक निघाल्यानंतर काही वेळातच स्फोटाचा प्रचंड दणका झाला. काही क्षणातच मिरवणूक विस्कळीत झाली. घटनास्थळी रक्तामांसाचा आणि शरीरांच्या तुटलेल्या अवयवांचा खच पडला होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
डीएसपीही ठार
मस्तुंग जिल्ह्याचे पोलीस उपमहानिरीक्षक (डीएसपी) नवाझ गष्कोरी हे या स्फोटात ठार झाल्याची माहिती देण्यात आली. हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असून आत्मघाती हस्तकाच्या माध्यमातून घडवून आणण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. तथापि, हे कृत्य पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेचेच असावे, असे स्फोट घडविण्याच्या पद्धतीवरुन दिसून येत आहे.
कारजवळच स्फोट
आत्मघाती दहशतवाद्याने डीएसपी गष्कोरी यांच्या कारजवळच हा स्फोट घडविला. यावेळी ते कारमध्येच होते. कारचा चक्काचूर झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. आत्मघाती दहशतवादीही ठार झाला. यावेळी कारच्या जवळ मिरवणुकीतील अनेक लोक होते. त्यांच्यापैकी अनेकजण या स्फोटात ठार झाले.
इतर शहरांमध्ये इशारा
बलुचिस्तानातील या घटनेनंतर पाकिस्तानातील इतर शहरांमध्ये प्रशासनाला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. राजधानी इस्लामाबाद, कराची, लाहोर, पेशावर इत्यादी महत्त्वपूर्ण शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर करण्यात आली आहे. अवतीभोवतीच्या परिसरात काही संशयास्पद हालचाली आढळून आल्यास, किंवा वस्तू आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. महत्त्वाच्या शहरांमध्ये पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे.
सरकारकडून निषेध
पाकिस्तानच्या मध्यवर्ती सरकारने या स्फोट हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. दहशतवाद्यांना कोणताही धर्म नसतो, असे पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने वक्तव्य केले आहे. पाकिस्तानचे अंतर्गत व्यवस्था मंत्री सर्फराझ अहमद बुगटी यांनी दहशतवाद्यांना सोडणार नसल्याचा इशारा दिला आहे. तसेच जखमींच्या साहाय्यार्थ प्रशासन सर्वशक्तीनिशी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सीमेवर तणाव
या स्फोटानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमारेषेवर बलुचिस्तानमध्ये तणाव निर्माण झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटाची जबाबदारी तालिबानची आहे, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. मात्र, हा आरोप अफगाणिस्तानने नाकारला आहे. या हल्ल्याच्या तपासासाठी आणि साहाय्यता कार्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांचा उपयोग केला जाईल, असे पाकिस्तान प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
भीषण स्फोटामुळे भीतीचे वातावरण
ड बलुचिस्तामधील स्फोटामुळे संपूर्ण पाकिस्तानात भीतीचे वातावरण
ड अनेक लोक गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढणे शक्य
ड या बाँबस्फोटामुळे पाकिस्तान-अफगाण संबंधांमध्ये बिघाड शक्य
ड पाकिस्तानच्या इतर शहरांमध्ये सावधानतेचा इशारा, सुरक्षा वाढविली