स्पाईसजेट संबंधितांना पुन्हा देणार प्रशिक्षण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
स्पाईसजेटच्या 90 वैमानिकांना नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (डीजीसीए) बोईंग मॅक्स-737 विमान उडविण्यास बंदी घातली आहे. या सर्वांना पुन्हा प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे ‘डीजीसीए’ने म्हटले आहे. त्यानंतर आम्हाला डीजीसीएचे पत्र मिळाले असून संबंधित सर्व वैमानिकांना कंपनी पुन्हा प्रशिक्षण देणार असल्याचे स्पाईसजेटच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. ‘डीजीसीए’च्या या कारवाईमुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कंपनीच्या कारभारावर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
‘डीजीसीए’ला बोईंग मॅक्स-737 विमाने उडविणारे स्पाईसजेटचे 90 वैमानिक अप्रशिक्षित आढळले आहेत. या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे या सर्व वैमानिकांना बोईंग मॅक्स-737 विमानाचे पायलट म्हणून ठेवण्यात आले होते. ‘बोईंग मॅक्स 737’च्या अपघातानंतर या विमानांच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली होती. तसेच ‘डीजीसीए’च्या निर्णयानंतर कंपनीच्या विमान ऑपरेशनवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा निर्वाळा दिला आहे. सध्या कंपनीकडे बोईंग मॅक्स-737 विमान उडवणारे 560 वैमानिक पूर्णपणे प्रशिक्षित असल्याचे सांगितले.
सध्या स्पाईसजेटकडे बोईंग मॅक्स-737 ची 11 विमाने आहेत. या विमानोड्डाणांसाठी 144 वैमानिकांची गरज आहे. मात्र, कंपनीकडे 560 वैमानिक असून ही संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे कंपनीला विमानसेवा चालवताना कोणतीही अडचण येणार नाही, असे स्पष्टीकरण स्पाईसजेटने दिले आहे.