अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन
वृत्तसंस्था/ मुंबई
आयसीसी विश्वचषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेची सुरुवात गतविजेत्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामन्याच्या एक दिवस आधी भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजनही केले जाणार आहे. या सोहळ्याची सर्व तयारीही पूर्ण झाली असून, त्यात प्रेक्षणीय ‘लेझर शो’चाही समावेश असून बॉलीवूड स्टार्स उद्घाटन सोहळ्यात परफॉर्म करणार आहेत.
दरम्यान, अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया उद्घाटन समारंभात आपल्या परफॉर्मन्सने चाहत्यांचे मनोरंजन करतील. याशिवाय, प्रसिद्ध गायक अरिजित सिंग, गायक श्रेया घोषाल आणि आशा भोसले 4 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. याशिवाय हा दिवस ‘कॅप्टन डे‘ म्हणून साजरा केला जाईल. या सोहळ्यात चाहत्यांना लेझर शो आणि आतषबाजीचा आनंद लुटता येणार आहे. तसेच आयसीसीच्या या कार्यक्रमात सर्व संघांचे कर्णधारही सहभागी होणार आहेत. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या उद्घाटन सोहळ्यात गुजराती संस्कृतीही दाखवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, हे सादरीकरण समारंभाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. दरम्यान, आयसीसी आणि बीसीसीआयचे उच्चपदस्थ अधिकारीही या सोहळ्याचा भाग असणार असून अनेक मान्यवरांना देखील या सोहळ्यासाठी निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.