8 वीचा विद्यार्थी ताब्यात
वृत्तसंस्था/ अयोध्या
अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या भगवान श्रीराम यांच्या मंदिराला बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. लखनौ कंट्रोल रुमला 112 कॉलवर ही धमकी देण्यात आली. यानंतर लखनौ पोलीस आणि अयोध्या पोलिसांनी तपास सुरू केला होता. या तपासात ज्या मोबाइल क्रमांकावरून कॉल करण्यात आला तो बरेली येथे सक्रीय असल्याचे आढळून आले होते.
पोलिसांनी मोबाइल क्रमांकाच्या आधारावर बरेली येथील विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. या विद्यार्थ्याचे वय 14 वर्षे असून तो इयत्ता आठवीत शिकत आहे. पोलीस आता विद्यार्थ्याची चौकशी करत आहेत. युट्युबवर व्हिडिओ पाहून मंदिराला बॉम्बने उडविण्याची धमकी दिल्याचे विद्यार्थ्याने पोलिसांना सांगितले आहे.
राम मंदिरात 21 सप्टेंबर रोजी बॉम्बस्फोट घडविणार असल्याचे या विद्यार्थ्याने फोन करून सांगितले होते. संबधित मोबाइल क्रमांक बरेली येथील रहिवाशाच्या नावावर नोंद होता. संबंधित इसमाने हा मोबाइल क्रमांक आपला मुलगा वापरत असल्याचे पोलिसांना चौकशीत सांगितले होते.