34 जणांनी गमावला जीव
वृत्तसंस्था/ इदलिब
रशियाच्या सुरक्षा दलांनी सीरियाच्या इदलिबमध्ये मोठा हवाईहल्ला केला आहे. रशियाच्या सैन्याने इदलिबच्या गव्हर्नरेटमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात 34 जण मारले गेले असून 60 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. रशियाच्या एअरोस्पेस फोर्सेसनी इदलिब प्रांतात सीरियाच्या सैनिकांवर हल्ले करणाऱ्या अवैध सशस्त्र गटांच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले असल्याचे रियर अॅडमिरल वादिम कुलित यांनी सांगितले आहे.
मागील 24 तासांमध्ये रशियन एअरोस्पेस फोर्सेसनी सीरियातील सशस्त्र गटांवर सातवेळा हवाई हल्ले केले आहेत. तर सीरियाच्या सैन्याने इदलिब आणि अलेप्पो प्रांतातील सरकारच्या नियंत्रणातील क्षेsत्रांवर झालेल्या हल्ल्यांसाठी बंडखोरांना जबाबदार ठरविले आहे.
रशिया आणि सीरियाचे सरकार गाझामध्ये सुरू असलेल्या संघर्षात जग गुंतले असल्याचा लाभ घेत इदलिबमध्ये हल्ले वाढवत आहेत. इदलिब क्षेत्रात 30 लाखाहून अधिक सीरियन नागरिक राहत आहेत. हे नागरिक सीरियाचे हुकुमशहा बशर अल-असाद यांच्या राजवटीला मान्यता देण्यास नकार देत असल्यानेच हे हल्ले होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला आहे.