शिरोडा : बोरी ग्रामपंचायतीने नियोजित केलेल्या वाढीव घरपट्टी व व्यावसायिक कर रचनेवर मंगळवारी झालेल्या पंचायत मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. नागरिकांचा या वाढीव घरपट्टीला विरोध असून सरपंच व पंचायत सचिव या निर्णयावर ठाम आहेत. सरपंच दुमिंगो वाझ यांच्या म्हणण्यानुसार सरकारच्या प्रस्तावित कर रचनेनुसार पक्क्या आरसीसी बांधकाम तसेच चिरे व सिमेंटच्या घरांना 40 रुपये प्रती चौरस मीटर दर निश्चित करण्यात आले आहेत. पंचायतीने सरकारने लागू केलेले दर न लावता आरसीसी बांधकामावर रु. 28 तर चिरे सिमेंटच्या घरांना रु. 14 प्रती चौ. मीटर दर निश्चित केले आहेत. मातींच्या घरासाठी वार्षिक घरपट्टी केवळ रु. 50 नियोजित करण्यात आली आहे. व्यावसायिक आस्थापनांना आरसीसी रचनेत रु. 200 असून पंचायतीने रु. 140 निश्चित केले आहेत. आरसीसी नसलेल्या व्यावसायिक आस्थापनाना रु. 70 प्रती चौ. मीटर निश्चित करण्यात आले आहेत. पंचायतीने गेल्या अनेक वर्षांपासून घरपट्टी व व्यावसायिक कर वाढवलेला नाही. सध्या आरसीसी बांधकामावर रु. 5 प्रती चौ. मीटर कर आकारला जात आहे. पंचायतीला महसूल वाढीसाठी आर्थिक उत्पन्नाचे विशेष स्रोत नाहीत. ऑक्ट्रोय कर ही थेट राज्य सरकारने आपल्या ताब्यात घेतलेला आहे, अशा परिस्थितीत कर वाढीशिवाय अन्य पर्याय नसल्याचे सरपंचाचे म्हणणे आहे. नागरिकांनी या नियोजित कर रचनेला विरोध करताना फोंडा तालुक्यातील इतर 18 ग्रामपंचायतीनी अद्याप घरपट्टी व व्यावसायिक कर वाढीचा कुठलाच निर्णय घेतलेला नाही. या वाढीव घरपट्टीबरोबरच घराची खोली भाडेपट्टीवर देणाऱ्या घरमालकांना किंवा दुकान भाड्यावर देण्याऱ्या नागरिकांकडून वर्षातून एका महिन्याचे भाडे पंचायतीला द्यावे लागणार आहे. त्या बदलात पंचायतीकडून कुठल्याच सुविधा दिल्या जातील हे पंचायतीने अद्याप स्पष्ट केलेले नाही. कचरा उचलण्यातही पंचायतीकडून विशेष प्रयत्न होत नाहीत. मात्र घरपट्टी व व्यावसायिक कर मोठ्या प्रमाणात वाढवून नागरिकांवर अतिरिक्त बोजा टाकलेला आहे. पंचसदस्यांचा त्याला विरोध असतानाही सरपंच व पंचायत सचिव आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे पुढील बैठकीत या मुद्यावरून तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
Previous Articleटॅक्सी व्यावसायिक मारहाणप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.