कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता
ओटवणे प्रतिनिधी
चराठा – ओटवणे घाटरस्त्या दरम्यान यु आकाराच्या वळणावर रस्त्यालगतची समोरासमोरील दोन्ही आकेशियाची झाडे कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी अनर्थ घडण्याची शक्यता असून वनखात्यासह सार्वजनिक बांधकाम खाते या ठिकाणी अपघाताची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल या मार्गावरील वाहन चालकांनी केला आहे.
ओटवणे दशक्रोशीत वाहतुकीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा मार्ग असून हा रस्ता पुढे दोडामार्ग तालुक्यात जातो. ओटवणे जनतेला सावंतवाडीत येण्या जाण्यासाठीही हा सर्वात जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची नेहमी वर्दळ असते. मात्र ओटवणे घाटीतील यु आकाराच्या वळणावरील रस्त्यालगची भर रस्त्यावर झुकलेली दोन्ही झाडे वाहन चालकांसाठी धोक्याची घंटा आहे. कोणत्याही क्षणी ही झाडे कोसळू शकतात अशी स्थिती आहे.त्यामुळे वन खात्यासह सार्वजनिक बांधकाम खात्याने याची त्वरीत दखल घेऊन ही झाडे हटवावीत. आणि संभाव्य अनर्थ टाळावा. अन्यथा या ठिकाणी दुर्घटना घडल्यास याला वन खात्यासह सार्वजनिक बांधकाम खाते जबाबदार राहणार असल्याचा इशारा ओटवणे दशक्रोशीतील वाहन चालकानी दिला आहे.