रमेश उबाळे यांच्या आंदोलनाला शशिकांत शिंदे, महेश शिंदेंची भेट
प्रतिनिधी/ सातारा
मेडिकल कॉलेजच्या बांधकामामध्ये जुन्या इमारती उतरवत असताना त्याचे साहित्य भंगारात विकून कोटय़ावधी रुपयांचा गफला झाला आहे. 1 कोटी रुपयांचा दरोडा घालणाऱयांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करत राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी कृष्णा खोरे कार्यालयाच्यासमोर आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला आमदार शशिकांत शिंदे व आमदार महेश शिंदे यांनी भेट देऊन पाठिंबा दिल्यामुळे जिल्हय़ाच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली. एकमेकांवर आरोपांच्या फैरी करण्याची एकही संधी न सोडणाऱया दोन्ही आमदार आंदोलनाच्या एकाच मांडवाखाली एकाचवेळी येऊन आंदोलनकर्ते रमेश उबाळे यांना पाठिंबा देऊन त्यांच्या मागण्यांसाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करु अशी ग्वाही दिली.
सातारा मेडिकल कॉलेजच्या जागेवरील जुन्या इमारती पाडण्याचे काम पूर्ण झाले. त्या इमारतीचे भंगार, लोखंड व इतर साहित्य काही भंगार चोरटय़ांनी भरदिवसा चोरले असा आरोप करत याची चौकशी व्हावी व संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावेत या मागणीसाठी रमेश उबाळे यांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे हे आले होते. त्यानंतर काही वेळातच शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनीही आंदोलनस्थळी भेट दिली. त्यामुळे राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या. महेश शिंदे यांनी वडाचे झाड भेट देत रमेश उबाळे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
आमदार महेश शिंदे यांचे एकेकाळी कट्टर असलेले रमेश उबाळे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यांनी कालपासून कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्या आंदोलनास आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण समितीचे सभापती सतीश चव्हाण, खेडचे पिटू गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते बसलेले होते.
अधिवेशनात प्रश्न मांडणार-आ. शशिकांत शिंदे
यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, मेडिकल कॉलेजच्या जागेवरील जुन्या इमारतीचे संबंधित जो कोणी भंगार चोरी करणारा आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. याबाबत मी या अधिवेशनातही प्रश्न उपस्थित करणार आहे. भंगाराबाबत टेंडर प्रसिद्ध झाले होते का? या जागेबाबतचा मालक कोण आहे, जबाबदारी कोणाची आहे. पाडले कोणी याबाबतची चौकशी होणे गरजेचे आहे. जर हे नियमानुसार झाले नसेल तर संबंधितांची चौकशी करुन गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे, असेही शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
आम्ही दोघेही पाठपुरावा करू-आ. महेश शिंदे
रमेश उबाळे यांनी उपस्थित केलेला मुद्दा रास्तच आहे. येथील भंगार परस्पर हटवले गेले त्याबाबत कोणी वर्कऑर्डर आहे का. जर या सर्व गोष्टी नियमानुसार झाल्या नसतील तर ही बाब गंभीर आहे. याची जबाबदारी कोणाची हे शोधणे गरजेचे आहे. संबंधितांची चौकशी होऊन गुन्हा दाखल झाला पाहिजे. उबाळे यांच्या या लढय़ासाठी आम्ही दोघेही आमदार म्हणून पाठपुरावा करू व त्यांना निश्चितच न्याय देऊ, असे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.
चौकट
आमच्या पक्षात आल्यावर भारी असतं…
सातारा येथे राष्ट्रवादीच्या आंदोलनाला शिंदे गटाचे आमदार महेश शिदे यांनी भेट दिली. त्यांनी वडाचे झाड भेट देऊन उबाळे यांचा सत्कार केला. त्यावेळी उबाळे म्हणाले, झाड देताना फोटो काढताय पण बातमी प्रवेशाची देऊ नका म्हणजे झालं. त्यावर आमच्या पक्षात आल्यावर भारी असते, असे महेश शिंदे यांनी सांगताच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप शिदे यांनी चिमटा काढला. फुकट पण नको अशी टीप्पणी करताच त्यावर लगेच उबाळे म्हणाले, मला पण हौस नाही आली. त्यावर दुसऱया एका कार्यकर्त्यांनी अंगावर भगवी शाल लागते, असे मार्मिंक उत्तर दिले.