अग्निशमन जवान रूद्रेश पांढरे, नागरिक विठठल वेंगुर्लेकर यांचे कौतुक
म्हापसा : काणका डिमेलवाडा येथे दीड दिवसाच्या गणपती विसर्जन वेळी विश्वाटी विश्वेश्वर शिवशंकर देवस्थान काणका तळ्यात पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे अल्पवयीन मुले बुडाली व गटांगळ्या खात बुडतो असे आरडाओरड करत असतानाच तेथे असलेले लोकांनी त्यांना वाचविले. काणकातील अग्निशमन दलाचे जवान रूद्रेश अरूण पांढरे व अन्य नागरिक विठ्ठल (दाय) वेंगुर्लेकर यांनी प्रसंगवधानाने कोणताही विचार न करता दोघांही अल्पवयीन मुलांना वाचविण्यात यश मिळविले. रूद्रेश व विठ्ठल या दोघानी दाखविलेल्या धाडसाचे गावात त्यांचे कौतुक होत आहे.
या बाबत माहिती अशी की, काणका गावातील काही गणपती विर्जनासाठी काणका तळ्यात आणले असता आरती होऊन रात्रौ पावणे बारा वाजण्याच्या दरम्यान मूर्ती विसजर्नासाठी नेत असतानाच काणका येथे भेलपूरी दुकानात काम पाहणारे दोघे 15 वर्षीय अल्पवयीन गणपती हातात घेऊन विसर्जनासाठी पाण्यात उतरले. गणपती हातात घेऊन पायऱ्या उतरून ते दोघेही पाण्यात गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाले. डुबकी घेऊन एकदा पाण्यात वर आले असता त्यांनी आरडाओरड केली. त्याचवेळी रूद्रेश पांढरे व विठ्ठल वेगुर्लेकर यांनी पाण्यात उडी घेऊन त्या दोघांना पाण्यातून बाहेर काढले. त्यांची चौकशी केली असता त्या दोघानाही पोहता येत नव्हते असे सांगितल्यावर स्थानिक नागरिकांनी त्या दोघांही युवकांना चोप दिला. रूद्रेश व विठ्ठल यांच्या प्रसंगवधानाने त्या दोघांचा जिव वाचल्याने सर्वांनी त्यांचे कौतुक केले. अग्निशमन दलाच्या संचालकांनी याची दखल घेऊन रूद्रेश यांना शौर्य पुरस्कार द्यावा अशी मागणी यावेळी देवस्थान अध्यक्ष आनंद पांढरे यांनी केली.