अवरादी बंधाऱ्यावरील घटना : शोधकार्य सुरू
बेळगाव : मोटारसायकलवरून जाणारे दोघेजण बंधाऱ्यावरून पडून घटप्रभा नदीत वाहून गेले आहेत. सोमवारी मुडलगी तालुक्यातील अवरादीजवळ ही घटना घडली असून नदीपात्रात वाहून गेलेल्या दोघाजणांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले. चन्नप्पा हरिजन (वय 39), दुर्गव्वा गोपाल दासर (वय 33) दोघेही राहणार अवरादी अशी त्यांची नावे आहेत. अवरादीहून महालिंगपूरला जाताना बंधाऱ्यावरून हे दोघे मोटारसायकलसह घटप्रभा नदी पात्रात वाहून गेले. या घटनेची माहिती समजताच मुडलगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दल व एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. दिवस मावळल्याने शोधकार्य थांबविण्यात आले असून मंगळवारी सकाळी पुन्हा शोध सुरू करण्यात येणार आहे. घटप्रभा नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढल्याने शोधकार्यात अडथळे येत असून मंगळवारी सकाळपासून शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे. या बंधाऱ्यावर संरक्षक कठडा नाही. चन्नाप्पा व दुर्गव्वा कामानिमित्त मोटारसायकलवरून जाताना थेट नदीपात्रात पडले. थोड्या अंतरावर मोटारसायकल सापडली असून चन्नाप्पा व दुर्गव्वा यांच्यासाठी शोध सुरू आहे. मुडलगी पोलीस पुढील तपास करीत आहेत.