मनपाने राबविली अतिक्रमण हटाव मोहीम
बेळगाव : कपिलेश्वरकडून शहापूर, नाथ पै सर्कलकडे जाणाऱ्या एसपीएम रोडवरील शिवाजी उद्यान परिसरात अनेकांनी रस्त्यावरच टपरी उभे करून व्यवसाय थाटला होता. त्यामुळे त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत होती. याबाबत तक्रारी दाखल झाल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने मंगळवारी या परिसरातील अतिक्रमणावर हातोडा मारला आहे. अनेकांची खोकी तसेच साहित्य जप्त केले आहे. यामुळे काही वेळ त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता. कपिलेश्वर पुलापासून महात्मा फुले रोडवर असलेल्या रहदारी सिग्नलपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुला अनेकांनी अतिक्रमण केले आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोकी उभे करून व्यावसाय सुरू केला. मात्र यामुळे दुचाकी, चारचाकीस्वारांना तसेच पादचाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत होता. रस्त्यावरच व्यवसाय थाटल्यामुळे वाहतुकीची कोंडीही होत होती. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने या परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली आहे. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सकाळीच महापालिकेचे अतिक्रमण पथक दाखल झाले. त्यानंतर त्यांनी या परिसरातील खोकीधारकांचे साहित्य तसेच खोकीही जप्त केली. यावेळी अनेकांनी विनंती केली. मात्र अतिक्रमण पथकाने त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत ही मोहीम राबविली. गणेशोत्सव काळातच ही मोहीम राबविल्यामुळे खोकीधारकांतून मात्र नाराजी व्यक्त करण्यात आली.