वृत्तसंस्था/ हांगझाऊ
बॉक्सिंगमध्ये भारताची आणखी पदके निश्चित झालेली असून ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेनने महिलांच्या 75 किलो गटात उपांत्य फेरीत प्रवेश करत आशियाई खेळांतील भारताचे तिसरे बॉक्सिंग पदक निश्चित केले. लोव्हलिनाने दक्षिण कोरियाच्या सुयोन सेओन्गविऊद्धची लढत 5-0 ने जिंकली. यावेळी सर्व पंचांनी भारतीय खेळाडूच्या बाजूने निकाल दिला.
तत्पूर्वी, प्रीती पवारने महिलांच्या 54 किलो वजनी गटात उपांत्य फेरीत प्रवेश मिळविताना किमान कांस्य पदकच नव्हे, तर पॅरिस ऑलिम्पिकमधील स्थानही निश्चित केले. तिने उपांत्यपूर्व फेरीत कझाकस्तानच्या झैना शेकेरबेकोव्हाचा 4-1 असा पराभव करून गुणांच्या जोरावर विजय मिळवला. ही लढत चुरशीची राहिली, पण चार पंचांनी भारतीय बॉक्सरच्या बाजूने, तर केवळ एका पंचाने झैनाच्या बाजूने निकाल दिला.
बॉक्सिंगमध्ये पॅरिस ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित करणारी प्रीती ही निखत झरिननंतर दुसरी भारतीय बॉक्सर ठरली आहे. सध्याची जागतिक विजेती असलेल्या झरिनने शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत जॉर्डनच्या हनान नासारचा 2 मिनिटांत पराभव करून 50 किलो वजनी गटात भारताचे पदक निश्चित केले होते. उपांत्य फेरीत तिची लढत थायलंडच्या चुथामत रकसातशी होणार आहे.