अध्यक्षांचा हस्तक्षेप करण्यास नकार
वृत्तसंस्था/ बोगोटा
कोलंबियाच्या पोलिसांनी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अध्यक्षांच्या पुत्राला अटक केली आहे. अध्यक्षांच्या पुत्रावर मागील वर्षी निवडणूक प्रचारावेळी जमा करण्यात आलेल्या निधीमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. निकोलस पेट्रो आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी डेसुरिस वाजक्वेज यांना बोगोटा येथील न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी अटक करण्यात आली. पुत्राला अटक झाल्यावर कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी याप्रकरणी चौकशीत हस्तक्षेप करणार नसल्याचे म्हटले आहे. एक व्यक्ती आणि पिता म्हणून मुलाला तुरुंगात जाताना पाहून दु:ख होते. परंतु प्रजासत्ताक देशाचा अध्यक्ष म्हणून तपासकर्त्यांच्या अधिकारक्षेत्रात हस्तक्षेप करणार नसल्याचे पेट्रो यांनी म्हटले आहे.
निकोलस पेट्रो यांना झालेली अटक कोलंबियाच्या सरकारसाठी मोठा झटका आहे. कोलंबिया सध्या अमेरिकेचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. पेट्रो यांच्या पुत्राने अमली पदार्थांच्या तस्करांकडून पैसे स्वीकारल्याचाही आरोप आहे.