कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी भारताच्या सरकारवर केलेल्या आरोपाने विनाकारण वाद निर्माण झाला आहे. कॅनडातील एक खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जर याची जूनमध्ये त्याच देशात हत्या झाली होती. ही हत्या भारत सरकारच्या हस्तकांनी घडवून आणली आणि त्यासंबंधीचा ‘विश्वासार्ह’ पुरावा असून चौकशी सुरु आहे, असे विधान ट्रूडो यांनी त्या देशाच्या संसदेत केले. एका देशाच्या सर्वोच्च नेत्याने हे विधान केले असल्याने त्यावरुन मोठा वाद निर्माण होणे स्वाभाविक होते. सध्या याच वादाचे पडसाद भारतात आणि जगभरात उमटत आहेत. ट्रूडो यांचा आरोप भारताने त्वरित आणि ठामपणे फेटाळला आहे. एकंदर घटनाक्रम पाहता, ट्रूडो यांनी हेतुपुरस्सर आणि आधी ठरवून ही वावटळ उठविली आहे, असे स्पष्टपणे दिसून येते. ते नुकतेच जी-20 शिखर परिषदेसाठी भारतात येऊन गेले. त्याआधी त्यांनी निज्जर हत्येसंबंधीचा मुद्दा ‘फाईव्ह आईज’ मध्ये (अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंड या देशांची संघटना) उपस्थित केला होता, असे वृत्त पाश्चिमात्य वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. अमेरिका आणि इतर देशांनी या घटनेसंबंधात जी-20 परिषदेत भारताचा निषेध करावा, असा आग्रह त्यांनी धरला होता. पण तो या चार देशांनी मान्य केला नाही. त्यामुळे जी-20 परिषद कोणत्याही वादग्रस्त मुद्द्यामुळे झाकोळली गेली नाही. हे वृत्त खरे असेल तर आपले मित्रदेश आपले न ऐकता भारताला महत्त्व देतात, याचा त्यांना संताप आला असावा. त्यांचा अहंकार दुखावला गेला असावा आणि आपल्या देशाच्या संसदेत स्वत: हा आरोप भारतावर करुन त्यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करुन दिली असावी, असे म्हणावयास बरीच जागा आहे. हा वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचा प्रकार झाला. तो एका बलाढ्या देशाच्या मुख्य नेत्याने करावा, हे शोभनीय नाही. सहसा, अशा संदर्भांमध्ये कोणत्याही देशाचे सर्वोच्च नेते अशा प्रकारचे थेट आरोप अन्य देशांवर करीत नाहीत. हे काम दुय्यम नेत्यांवर सोपविले जाते. तसेच चौकशी संपल्याशिवाय अशी विधाने केली जात नाहीत. पण ट्रूडोंनी या कथित प्रकरणात स्वत: पुढाकार घेऊन चौकशी पूर्ण होण्याआधीच उतावळेपणाने विधाने केली आहेत. यामुळे कॅनडाचीच बाजू कमकुवत झाली असून वातावरण मात्र, बिघडले आहे. आता भारतालाही कॅनडाविरोधात ठाम भूमिका घेणे अनिवार्य झाले असून त्याने ट्रूडो यांचे आरोप स्पष्टपणे फेटाळले आहेत. ट्रूडो यांच्या या असमंजस आणि बेजबादार विधानांमुळे भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध तर तणावपूर्ण झाले आहेतच, शिवाय खलिस्तानवादी दहशतवाद्यांचे बळ वाढले आहे. सर्व हिंदूंनी कॅनडा सोडावा आणि भारतात परतावे, असे प्रक्षोभक आणि अपमानजनक विधान गुरपतवंतसिंग पन्नू या खलिस्तानवाद्याने ट्रूडो यांच्या आरोपानंतर त्वरित केले. यावरुन हे सिद्ध होते की ट्रूडो यांचा आरोप खलिस्तानवादी आणि दहशतवादी त्यांच्या फायद्यासाठी उपयोगात आणणार आहेत. ते चेकाळले तर भारतालाही आपल्या संरक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचा अधिकार अपोआप प्राप्त होईल. या सर्व घटनाक्रमात पाकिस्तानची आयएसआय ही उपद्रवी संघटनाही आपले हात धुवून घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण पंजाबमधील दहशतवादात या संघटनेचा मोठा हात आहे. तसे झाल्यास ज्या घटना घडतील त्यांची सर्व जबाबदारी ट्रूडो यांच्यावरच असेल. भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाची दहशतवादविरोधातील कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची आहे. आपल्या देशात फोफावणाऱ्या खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटनांना आवर घालण्यात त्यांचे प्रशासन सपशेल अयशस्वी ठरले आहे. खरेतर कॅनडात सांप्रतच्या काळातच नव्हे, तर 70 च्या दशकापासूनच खलिस्तानवादी संघटना निर्माण झाल्या होत्या. त्याच काळात जस्टीन ट्रूडो यांचे पिता पियर ट्रूडो हे कॅनडाचे पंतप्रधान होते. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पियर ट्रूडो यांना या दहशतवादी संघटनांच्या संदर्भात इशारा दिला होता आणि त्यांना वेळीच आवर घालण्याचे आवाहन केले होते, अशी माहिती प्रसिद्ध झाली आहे. पण पियर ट्रूडो यांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. आज त्यांचे पुत्र जस्टीन ट्रूडो हे आपल्या पित्याचीच परंपरा पुढे चालवत आहेत. ते त्यांच्या देशातील अशा दहशतवाद्यांसंबंधी बोटचेपी भूमिका का घेतात, याचे कारण तेथील स्थानिक राजकारणात दडलेले आहे. कॅनडात शीख लोकांची संख्या मोठी आहे. तेथे ती एक मतपेटी आहे. खलिस्तानवाद्यांविरोधात कठोर भूमिका घेतल्यास शीख समुदाय आपल्या विरोधात जाईल, अशी ट्रूडो यांच्या पक्षाला शक्यता वाटते. त्यामुळे भारताचे काहीही होवो, आपण आपल्या राजकीय हिताचा विचार करावा, अशी त्यांची संकुचित भूमिका असू शकते. 1985 मध्ये कॅनडातील खलिस्तानवाद्यांनी एअर इंडियाचे प्रवासी विमान उडवून आपले भयानक उपद्रवमूल्य सिद्ध पेले होते. त्या हल्ल्याची चौकशी त्या देशाने आजपर्यंतही गंभीरपणाने केलेली नाही. वास्तविक कॅनडा किंवा इतर कोणत्याही देशातील शीख समुदाय मोठ्या बहुसंख्येने खलिस्तानवादाचा समर्थक नाही. प्रत्यक्ष भारतातील पंजाबमध्येही 80 च्या दशकात जे भीषण वातावरण होते, ते नाहीसे होऊन शांतता निर्माण झाली आहे. कॅनडातील मूठभर खलिस्तानवादी वातावरण बिघडवत असतील तर त्यांना नियंत्रणात आणणे तेथील प्रशासनाचे कर्तव्य आहे. ते पार पाडण्याऐवजी ट्रूडो भारतावरच बिनबुडाचे आरोप करुन आपले अपयश झाकण्याच्या प्रयत्नात आहेत. ‘तुम्ही तुमच्या परसात विषारी साप पाळलेत, तर ते केवळ शेजाऱ्यालाच चावतील असे गृहित धरणे शहाणपणाचे नाही. ते तुम्हालाही चावू शकतात’ असा इशारा एकेकाळी अमेरिकेच्या विदेश मंत्री हिलरी क्लिंटननीं पाकिस्तानला दिला होता. हाच इशारा ट्रूडो यांनाही लागू पडतो. आज ते त्यांच्या सत्ताकारणासाठी खलिस्तानवाद्यांना पाठीशी घालत असतील तर आज ना उद्या कॅनडातली शांतताही धोक्यात येणारच. भारतात या सर्व घटनाक्रमात समाधानाची बाब अशी की काँग्रेसने केंद्र सरकारला समर्थन दिले असून ट्रूडो यांच्यावर टीका केली आहे. कारण हा राष्ट्रीय मुद्दा असून सारा भारत एकत्रित आहे, असा संदेश जगाला मिळणे आवश्यक आहे.
Previous Articleआशियाई स्पर्धेसाठी बिल्किस मिर कॅनोईंग, कायकिंग पंच
Next Article लोकमानसातले गणपती दैवत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment