गंगा नदीपात्रात दुर्घटना
वृत्तसंस्था/ खागरिया
बिहारमधील खागरिया येथील अगुवानी-सुलतानगंज दरम्यान गंगा नदीवर बांधण्यात येत असलेल्या निर्माणाधीन पुलाचा काही भाग रविवारी कोसळला. सुमारे 192 मीटर क्षेत्रातील पुलाचे चार खांब नदीत बुडाले. या दुर्घटनेनंतर पूल निगमच्या व्यवस्थापकीय संचालकांसह पथकाने घटनास्थळी जाऊन तपासणी केली. सुदैवाने हा अपघात झाला त्यावेळी ते मजूर तेथून 500 मीटर अंतरावर काम करत असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पुलाचा मोठा भाग कोसळल्याने गंगा नदीत काही फूट उंच लाटा उसळल्यानंतर नदीपात्रातील बोटींवर असलेले लोक भयभीत झाले.
गेल्या वषीही याच पुलाचा काही भाग कोसळला होता. 2014 मध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या हस्ते या पुलाची पायाभरणी करण्यात आली होती. 2015 पासून पुलाचे बांधकाम सुरू आहे. या पुलाची लांबी 3.16 किमी असून त्याचा अंदाजित खर्च 1710.77 कोटी इतका आहे. हा पूल अगुवानी आणि सुलतानगंज घाट (भागलपूर जिल्हा) दरम्यान बांधला जात आहे. पुलाच्या बांधकामामुळे खागरिया ते भागलपूर हे 90 किलोमीटरचे अंतर केवळ 30 किलोमीटर होणार आहे.