भारतीय कुस्ती संघटनेचे प्रमुख ब्रिज भूषण यांना पद सोडण्याचा आदेश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय कुस्ती संघटना आणि कुस्तीपटू यांच्यात चाललेल्या संघर्षाने आता वेगळे वळण घेतले आहे. संघटनेच्या प्रमुखांवर महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण करण्याचा आरोप करण्यात आला असून त्यामुळे त्यांना पद सोडण्याचा आदेश भारतीय ऑलिंपिक संघटनेने दिला आहे. तसेच कुस्तीपटूंच्या समस्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करुन तोडगा काढण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. त्यानंतर कुस्तीपटूंनी आपले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. भारतीय कुस्ती संघटनेचे सचिव विनोद तोमर यांना निलंबित करण्यात आले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व गाजलेले कुस्तीपटू विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि रवी दहिया यांनी केले होते. हे सर्व कुस्तीपटू आंतरराष्ट्रीय पदक विजेते आहेत. त्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱयांशी अनेक तास चर्चा केल्यानंतर आणि त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी ही चर्चा झाली.
समिती स्थापन
कुस्तीपटूंच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी अवलोकन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यांची नावे घोषित करण्यात आली आहेत. समिती आपला अहवाल एक महिन्यामध्ये सादर करेल. चौकशी पूर्ण होईपर्यंत कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग हे पदापासून दूर राहतील. तसेच ते चौकशीला सहकार्य करतील. प्रत्यक्ष चौकशीचे काम चार आठवडय़ांमध्ये करण्यात येईल, असे चर्चेत ठरल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.
आंदोलन नकोच होते
कुस्तीपटूंची आंदोलन करण्याची इच्छा नव्हती. तथापि, आम्हाला नाईलाजास्तव तो निर्णय घ्यावा लागला. कारण आमच्या सहनशक्तीचा अंत पाहण्यात आला होता. पाणी डोक्यावरुन वाहू लागले होते. 2023 हे वर्ष आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. कारण आता एशियन गेम्स आणि ऑलिंपिक पात्रता फेऱया जवळ येत आहेत. आता आम्हाला सरावावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. आम्ही आता अन्य कोणत्याही बाबींचा विचार करणार नाही, असे प्रतिपादन पुनियाने केले.
कुस्ती संघटनेने आरोप फेटाळले
कुस्ती संघटनेच्या अध्यक्षांवर किंवा इतर पदाधिकाऱयांवर करण्यात आलेले महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप धादांत खोटे आहेत. हे आरोप हेतुपुरस्सर आणि मानहानी करण्याच्या उद्देशाने करण्यात आले असून ते नाकारण्यात येत आहेत, असे स्पष्टीकरण भारतीय कुस्ती संघटनेने एका पत्रकाद्वारे केले आहे. संघटनेच्या अध्यक्षांवर होणाऱया आरोपांमुळे संघटनेची नाहक बदनामी होत असून संघटना याविरोधात कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबू शकते, असे संघटनेच्या काही पदाधिकाऱयांचे म्हणणे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, चौकशी समिती स्थापन झाल्यानंतर कुस्ती संघटनेचे सचिव विनोद तोमर यांना निलंबित करण्यात आल्याने कुस्ती संघटना अडचणीत येण्याची शक्यता आहे.
बेकायदा स्थलांतरितांच्या डिटेन्शन केंद्रांची संख्या वाढविणार